Congress: होय, ‘ती’ माझी चूक झाली…; काँग्रेस कार्यकारणी बैठकीत सोनिया गांधींची स्पष्ट कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 03:46 PM2022-03-14T15:46:46+5:302022-03-14T15:47:14+5:30
५ राज्यातील काँग्रेस निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी गांधी कुटुंबाची आहे असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली – देशात नुकतेच ५ राज्यांचे निकाल लागले आहेत. या निकालात सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ज्या पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती तिथे अरविंद केजरीवालांच्या ‘आप’नं काँग्रेसचा दारूण पराभव केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्यास सुरूवात केली आहे. यातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Congress Sonia Gandhi) यांचं मोठं विधान समोर आलं आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा बचाव करणं ही माझी चुकी होती. मी कॅप्टन यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत रविवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पदावरून हटवायचं होतं तर आधीच हटवलं पाहिजे होतं असा विषय चर्चेला आला. तेव्हा सोनिया गांधींनी हे विधान केले. निवडणुकीपूर्वीच अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली. भाजपासोबत आघाडी करून त्यांनी पंजाब निवडणुकीत उमेदवार उभे केले. परंतु त्यांच्या पक्षाला काही करिष्मा करता आला नाही.
अमरिंदर सिंग यांचा गांधी कुटुंबावर निशाणा
दुसरीकडे अमरिंदर सिंग यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ५ राज्यातील काँग्रेस निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी गांधी कुटुंबाची आहे. भ्रष्ट चन्नी आणि विचलित सिद्धुच्या पाठिंब्यावर काँग्रेसनं स्वत:ची कबर खोदली. पंजाबच नव्हे तर यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर याठिकाणीही गांधी कुटुंबामुळेच पराभव झाला. याचं कारण म्हणजे गांधी घराण्यावरील लोकांचा विश्वास आता उठत चालला आहे.
आम्ही त्याग करण्यास तयार
रविवारी काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, काही लोकांच्या मते, गांधी कुटुंबामुळे पक्ष कमकुवत होत आहे. जर पक्षातील नेत्यांनाही असं वाटेल असेल तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या त्यागाला सामोरे जाण्यास तयार आहोत. आमचं पहिलं लक्ष्य काँग्रेस मजबूत करण्याकडे आहे. त्यासाठी कुठल्याही त्याग देण्यास आम्ही तयार आहोत असं त्यांनी सांगितले. आता एप्रिल महिन्यात काँग्रेसचं चिंतन शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. तोवर सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षा राहतील. परंतु काँग्रेस पक्षातील नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठिंबा देत पराभवाला राज्यातील नेते आणि खासदार, आमदार जबाबदार आहेत. केवळ एकट्या सोनिया गांधी नाही असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.