Congress Jairam Ramesh News: लोकसभा निवडणुकीचे पाच टप्प्यातील मतदान झाले असून, आता फक्त दोन टप्प्यांचे मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. पाच टप्पे झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच आता इंडिया आघाडीला चांगला जनाधार मिळणार असून, स्पष्ट बहुमत मिळेल आणि त्यानंतर दोन दिवसांत पंतप्रधान कोण असेल, याचा निर्णय जाहीर केला जाईल, असा दावा करण्यात आला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महासचिव जयराम रमेश यांनी याबाबत दावा केला आहे. सर्वांत मोठ्या पक्षाचा नेते पंतप्रधान पदाचा मुख्य दावेदार असेल, २००४ प्रमाणे प्रक्रिया केली जाईल, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. राहुल गांधी पंतप्रधानपदाचे दावेदार असतील का, असा प्रश्न जयराम रमेश यांना विचारण्यात आला होता. यावर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत मतदान झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
शॉर्टकट ही मोदींची कार्यशैली, आमची नाही
सन २००४ मध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना बहुमत मिळाल्याच्या चार दिवसांत मनमोहन सिंग यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी ४ दिवसही लागणार नाहीत. दोन दिवसांत पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाईल. खासदार एकत्रितपणे निवड करतील. ती एक प्रक्रिया आहे. आम्ही शॉर्टकटवर विश्वास ठेवत नाही. ही मोदींची कार्यशैली असू शकते, आम्ही अहंकारी नाही, निकाल येतील, स्पष्ट जनादेश असेल, निर्णायक जनादेश असेल. यानंतर काही तासांत पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाईल. सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवारच पंतप्रधान असेल. २००४ मध्ये जसे घडले होते तसे होईल, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांची पुनरावृत्ती यंदा पुन्हा पाहायला मिळेल. भाजपाच्या एनडीएचे इंडिया शायनिंग फ्लॉप झाले होते. तसेच आताही दिसून येईल. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या काही टप्प्यातील मतदानानंतर अनेक ठिकाणचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपाच्या कामगिरीबाबत पंतप्रधान मोदी यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.