Jairam Ramesh Vs BCCI: २०२३ चा आयसीसी विश्वचषक उंचावण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर, कलाकार, बॉलिवूड सेलिब्रिटी यांनी हजेरी लावली होती. मात्र, कपिल देव यांना आमंत्रण न दिल्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. याप्रकरणी काँग्रेसने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयवर टीका केली आहे.
२०२३ च्या फायनलसाठी बीसीसीआयने माझ्यासह ८३ च्या संघातील सर्वांना आमंत्रित करणे अपेक्षित होते पण त्यांनी कोणालाच बोलवले नाही, अशी खदखद कपिल देव यांनी व्यक्त केली. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी सांगितले की, मुलाखतीसाठी तुम्ही मला बोलावले आणि मी इथे आलो. पण बीसीसीआयने बोलावलेच नाही. खरे तर १९८३ चा संपूर्ण संघ तिथे बोलवायला हवा होता असे मला वाटते. पण, आता सर्वकाही वेगळे असून काही लोक मागील गोष्टी विसरत आहेत, या शब्दांत कपिल देव यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे.
जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत बीसीसीयावर निशाणा साधला. कपिल देव यांना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी न बोलवणे चुकीचे आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. बीसीसीआयने त्यांना या सामन्यासाठी बोलवले नाही. विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये होता. कपिल देव यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या महिला मल्लांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मनात जी गोष्ट असते ती कपिल देव करतात. त्यांनी महिला मल्लांना पाठिंबा दिल्यानेच त्यांना बोलवले गेले नाही का, अशी विचारणा जयराम रमेश यांनी केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्राधान्यक्रम स्पष्ट आहेत. त्यांच्याकडे मणिपूरला जाण्यासाठी वेळ नाही, पण क्रिकेट सामना पाहण्यासाठी पूर्ण वेळ आहे. पंतप्रधानांनी अहमदाबादमधील त्यांच्या नावाच्या स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी वेळ काढला. आता ते राजस्थान आणि तेलंगणात जाऊन काँग्रेसला शिव्या घालतील, पण तरीही त्यांना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही, तिथे अजूनही तणाव आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.