पंडित नेहरूंचे नाव कोणी पुसू शकत नाही; काँग्रेसचे जयराम रमेश यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 05:36 AM2023-08-17T05:36:22+5:302023-08-17T05:37:57+5:30
एनएमएमएलचे नाव अधिकृतपणे बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी असे करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेसने बुधवारी नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे (एनएमएमएल) पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल) सोसायटी असे नामांतर केल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका केली. सतत हल्ले होत असले तरी देशातील पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वारसा चिरंतन जिवंत राहील आणि ते येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, असे काँग्रेसने म्हटले आहे.
१४ ऑगस्टपासून एनएमएमएलचे नाव अधिकृतपणे बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी असे करण्यात आले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केले की, “आजपासून एका प्रतिष्ठित संस्थेला नवीन नाव मिळाले आहे. सरकारचा एकमेव अजेंडा नेहरू आणि नेहरूंचा वारसा नाकारणे, विकृत करणे, बदनामी करणे आणि नष्ट करणे हा आहे. त्यांनी ‘एन’ मिटवले आहे आणि ते ‘पी’ने बदलले आहे. नेहरूंचे स्वातंत्र्य चळवळीतील अतुलनीय योगदान आणि भारताच्या राष्ट्र-राज्याचा लोकशाही, धर्मनिरपेक्ष, वैज्ञानिक आणि उदारमतवादी पाया उभारण्यात त्यांचे मोठे यश कोणीही पुसून टाकू शकत नाहीत.