“भाजपाचे ऑपरेशन फेल, राज्यपाल PMO च्या इशाऱ्यावर काम करतायत”; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 08:15 PM2024-02-05T20:15:19+5:302024-02-05T20:15:53+5:30
Congress Vs BJP: भाजपाचे झारखंडमधील योजना आणि सगळे ऑपरेशन फेल गेले, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
Congress Vs BJP: हेमंत सोरेन यांच्यावरील ईडीची कारवाई, मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा आणि झारखंडमधील राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने आपला गड कायम राखला आहे. हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. यानंतर चंपई सोरेन यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. चंपई सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर, भाजपाचे ऑपरेशन फेल गेले, असे सांगत काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली आहे.
झारखंडमधील सरकार पाडण्यासाठी भाजप ‘ऑपरेशन लोटस’ चालवत असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात होता. याबाबत जयराम रमेश म्हणाले की, भाजपाचे ऑपरेशन फेल गेले आहे. आता आमचे युतीचे सरकार उर्वरित एक वर्ष आरामात पूर्ण करेल. यानंतर आमच्या कामाची माहिती देऊन जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा निवडणूक लढवू. राज्यपाल पंतप्रधान कार्यालयाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला.
सोरेन सरकार बहुमत मिळवेल, याचा विश्वास होता
चंपई सोरेन सरकार बहुमत मिळवेल, यावर आमचा विश्वास होता. आम्हाला ४७ आमदारांचा पाठिंबा होता, जो बहुमतापेक्षा जास्त आहे. मात्र, भाजपा ऑपरेशन अयशस्वी झाले. भाजपाने आधी हेमंत सोरेन यांना अटक केली आणि नंतर चंपई सोरेन यांच्या शपथविधीला उशीर केला. मात्र, भाजपाची संपूर्ण योजना फसली, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमध्ये आहे. जयराम रमेश यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यावर टीका केली. अनेक राज्यांमध्ये राज्यपाल पक्षपातीपणा करत आहेत. तामिळनाडू, केरळ, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, झारखंड आणि बिहारमधील राज्यपाल पंतप्रधान मोदींचे कार्यालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करतात, असा आरोप जयराम रमेश यांनी केला.