Lok Sabha Security Breach Parliament Attack: संसद सुरक्षेत झालेल्या त्रुटीबाबत जोपर्यंत गृहमंत्री निवेदन देत नाहीत, तोपर्यंत संसदेचे कामकाज चालेल असे वाटत नाही. संसदेचे कामकाज चालावे आणि त्यात सहभागी व्हायचे आहे, हे आम्हालाही हवे आहे. मात्र, संसदेतील घडलेल्या घटनेबाबत गृहमंत्री निवेदन देण्यापासून पळ काढत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. यावर गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायलाच हवे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, त्यांनी संसदेबाहेर या घटनेबद्दल मीडियाशी संवाद साधला. परंतु सभागृहातील प्रश्नांना उत्तरे देण्यास नकार दिला. ही दुर्दैवी बाब आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली. हल्लेखोरांना पास देणारे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांची भूमिका काय? असा सवाल करत, विरोधी पक्षांची सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली.
गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात येऊन उत्तर द्यायलाच हवे
गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात येऊन उत्तर द्यायलाच हवे, अशी आग्रही मागणी जयराम रमेश यांनी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे चार दिवस कामकाज होणार आहे. जे प्रश्न उपस्थित केले जातील, त्यावरही स्पष्टीकरण द्यायला हवे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा सभापतींना विरोधकांच्या मागणीबाबत माहिती दिली आहे, असे जयराम रमेश यांनी सांगितले. तसेच राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहातून खासदारांना निलंबित केले, त्यांची काय चूक होती. हे सर्व खासदार संसदेत झालेली घुसखोरी आणि सुरक्षेतील त्रुटी याबाबत गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावे, हीच मागणी करत होते. गृहमंत्री अहंकारी आहेत, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.
दरम्यान, संसद घुसखोरीबाबत दोन ते तीन तासांत चर्चा होईल. या चर्चेला गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे, एवढीच विरोधकांची मागणी आहे. यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज सुरळीत सुरू राहील, असे जयराम रमेश म्हणाले.