“नितीश कुमार भाजपाविरोधात लढतील असा आमचा विश्वास होता”; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 11:59 AM2024-01-28T11:59:37+5:302024-01-28T12:04:04+5:30
Bihar Politics: नितीश कुमार यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
Bihar Politics:बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी पाटणा येथील राजभवनात येऊन रविवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राजभवनात राज्यपालांना भेटून नितीश यांनी त्यांना सांगितले की, आम्ही राज्यातील महागठबंधनशी म्हणजे लालू यादव राष्ट्रीय जनता दलाशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बिहारमधील राजकीय सत्तांतरावर भाष्य केले आहे.
राज्यातील 'महागठबंधन' राजवट संपवून नितीश कुमार हे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) पुन्हा सामील होणार असल्याचेही जवळपास निश्चित आहे, असे समजते. २४३ जागांपैकी लालू यादवांच्या आरजेडीचे ७९, भाजपाचे ७८ आणि नितीश कुमारांच्या जेडी(यू)चे ४५ आमदार आहेत. तर काँग्रेस १९, CPI (M-L)चे १२, CPI(M) आणि CPI यांचे प्रत्येकी २ आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर) चे ४ आमदार आहेत. याशिवाय आणखी दोन जागांपैकी एकावर एमआयएम आणि एक जागी अपक्ष आमदार आहे.
नितीश कुमार भाजपाविरोधात लढतील असा आमचा विश्वास होता
प्रसारमाध्यमांशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, इंडिया आघाडीच्या आतापर्यंत झालेल्या तीनही बैठकांमध्ये नितीश कुमार यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे ते भाजपाविरुद्ध लढतील असे आम्ही गृहीत धरत होतो. आम्हाला अजूनही इंडिया आघाडी देशात मजबूत हवी आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि ममता बॅनर्जी यांच्यात युतीबाबत बोलणीही झाली आहेत, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली.
दरम्यान, जदयू नेते नीरज कुमार म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना भारत जोडो न्याय पदयात्रा काढण्याचा अधिकार आहे. या यात्रेचे फलित म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ही यात्रा पोहोचल्यावर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाजूला झाल्या. आता ही यात्रा बिहारमध्ये दाखल होणार आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक राजकीय घडामोडी बदलत आहेत. साहजिकच राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करायला हवे. त्यांच्या रणनीतीत कुठे चूक झाली की, ते जिथे जातात तिथे त्यांचे मित्रपक्ष साथ सोडून जातात, असे नीरज कुमार यांनी म्हटले आहे.