"आसामचे मुख्यमंत्री असो किंवा ज्योतिरादित्य सिंधिया, सगळे वॉशिंग मशिनचे लाभार्थी आहेत", जयराम रमेश यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 09:52 PM2024-03-03T21:52:28+5:302024-03-03T21:54:51+5:30
Jairam Ramesh : खासदार राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांच्या भारत जोडो न्याय यात्रेत शेतकरी, तरुण, महिला आणि मजुरांना डोळ्यासमोर ठेवून पाच न्याय हमींची चर्चा केली आहे, असे जयराम रमेश म्हणाले.
नवी दिल्ली : काँग्रेस सोडून सत्ताधारी भाजपामध्ये सामील झालेल्या नेत्यांना काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी रविवारी (3 मार्च) वॉशिंग मशीन म्हटले. ते म्हणाले की, काँग्रेस सोडून गेलेले दलबदलू नेते वॉशिंग मशीनचे लाभार्थी आहेत. दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीतील पक्ष अनेकदा भाजपाला 'वॉशिंग मशीन' उपमा देतात आणि असे म्हणतात की, ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित आहेत, ते भाजपामध्ये गेल्यानंतर स्वच्छ होतात.
खासदार राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांच्या भारत जोडो न्याय यात्रेत शेतकरी, तरुण, महिला आणि मजुरांना डोळ्यासमोर ठेवून पाच न्याय हमींची चर्चा केली आहे, असे जयराम रमेश म्हणाले. तसेच, ज्यांना वॉशिंग मशीनची गरज आहे, ते लोक भाजपामध्ये सामील होत आहेत. तुम्ही पक्ष सोडलेल्या काँग्रेस नेत्यांची गणना करा, मग ते आसामचे मुख्यमंत्री असोत (मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा), सर्व या वॉशिंग मशीनचे लाभार्थी आहेत, असे म्हणत जयराम रमेश यांनी भाजपावर निशाणा साधला.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडल्याच्या प्रश्नावर जयराम रमेश म्हणाले, "प्रत्येकाला वेगवेगळ्या आकाराच्या वॉशिंग मशीनची गरज असते. काहींना लहान, काही मध्यम आकाराचे वॉशिंग मशीन आवश्यक आहे, तर काहींना टाकीच्या आकाराचे वॉशिंग मशीन आवश्यक आहे." याशिवाय, "दर दशकात होणारी जनगणना 2021 मध्ये सुरू होणार होती, परंतु जनगणना झाली नाही. 2011 च्या जनगणनेची जाती-संबंधित आकडेवारी केंद्रातील मोदी सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही", असा दावा काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी केला.
याचबरोबर, सत्ता, संपत्ती आणि जमिनीचा लोभ असलेले लोकच काँग्रेस सोडत असल्याचा दावा काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी केला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर निशाणा साधत दिग्विजय सिंह म्हणाले, फक्त तेच लोक पक्ष सोडत आहेत, ज्यांना सत्ता, पैसा आणि जमिनीची लालूच आहे. तसेच, वैचारिक राजकारणावर विश्वास नाही, पण सत्ता मिळविण्यासाठी राजकारण करणारेच पक्ष सोडत आहेत, असेही दिग्विजय सिंह यांनी सांगितले.