पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये, विनेश फोगटने ५० किलो कुस्तीच्या सामन्यात क्युबाच्या युसनेलिस युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करून इतिहास रचला. यासह भारताचं मेडल आता निश्चित झालं आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विनेश फोगटने फायनलमध्ये धडक मारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचं सिल्वर किंवा गोल्ड मेडल पक्क असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधान तिला कॉल करणार का? असा खोचक सवाल देखील विचारला आहे.
जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचं सिल्वर किंवा गोल्ड मेडल निश्चित आहे. नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधान तिला कॉल करतील का? अर्थात तिचं अभिनंदन करण्यासाठीच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महिला कुस्तीपटूंनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांच्यासोबत जे गैरवर्तन केलं त्यासाठी माफी मागणार का?" असंही म्हटलं आहे.
विनेश फोगटचे काका महावीर फोगट म्हणाले की, "आम्हाला पूर्ण आशा आहे की, ती गोल्ड मेडल मिळवेल. ती खूप चांगली खेळली आणि भविष्यातही चांगली खेळेल. संपूर्ण देश आनंदी आहे." याशिवाय बजरंग पुनियानेही भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.
विनेशच्या विजयानंतर बजरंग पुनियाचा खोचक टोला
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "विनेशच्या विजयावर कशी प्रतिक्रिया द्यायची हे मला समजत नाही. पहिल्यांदाच, आपण आनंदी आहोत की रडत आहोत हे मला समजत नाही. संपूर्ण भारतच या मेडलची आतुरतेने वाट पाहत आहे."
"विनेशने इतिहास रचला आहे. विनेश महिला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.आज सर्व भारतीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. या देशाच्या कन्या आहेत, ज्यांनी नेहमीच देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. ज्यांनी या मुलींच्या मार्गात नेहमीच काटे आणले आहेत, त्यांनी निदान या मुलींकडून आता तरी धडा घ्यावा. म्हणजे भविष्यात या मुलींच्या मार्गात काटे पेरण्यापासून परावृत्त होतील" असंही बजरंग पुनिया यांने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.