बंगळुरू - राज्यात होणाऱ्या तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमध्ये तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मंगळवारी रात्री जनता दल सेक्युलरच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस महासचिव सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली आहे. " काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर हे दोन्ही पक्ष आगामी पोटनिवडणुकीत भाजपाला धूळ चारण्यासाठी एकत्रित प्रचार करतील. तसेच एकत्र निवडणूक लढवतील. तसेच तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदार संघात होत असलेल्या या पोटनिवडणुकीत पाचही जागांवर कब्जा करण्याचा आमचा प्रयत्न असेल.धर्मनिरपेक्ष पक्षांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. " असे सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांच्यात आघाडीसाठी चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीस माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा, पक्षाचे महासचिव दानिश अली, काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे उपस्थित होते.
पोटनिवडणुकीत भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसची हातमिळवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 8:30 AM