कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसने खेळला अखेरचा डाव; बंडखोरांनी उलटवला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 08:42 AM2019-07-22T08:42:58+5:302019-07-22T08:44:50+5:30
बंगळुरू : कर्नाटकातील आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस -जेडीएसने शेवटचा डाव खेळला असून यालाही बंडखोर आमदारांनी टोलवले आहे. तसेच आम्हाला ...
बंगळुरू : कर्नाटकातील आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जेडीएसने शेवटचा डाव खेळला असून यालाही बंडखोर आमदारांनी टोलवले आहे. तसेच आम्हाला कोणीही बंदुकीच्या धाकावर मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले नसून आम्ही आमच्या मर्जीनेच येथे राहत असल्याचे या आमदारांनी स्पष्ट केले आहे.
बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी अपयशी ठरलेल्या काँग्रेस-जेडीएस सरकारने शेवटचा पत्ता खोलला आहे. यामध्ये मुख्यमंत्रीच बदलण्याचा प्रस्ताव दिला आहे. या बंडखोरांनी राजीनामा देताना कुमारस्वामींनाच जबाबदार ठरविले होते. यामुळे या आमदारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव दिला आहे. या आमदारांच्या म्हणण्यानुसार सा. बांधकाम मंत्री आणि कुमारस्वामी यांचे भाऊ एचडी रेवन्ना यांच्या हस्तक्षेपामुळे राजीनामा देत आहोत. या आमदारांनी सध्याच्या संकटाला कुमारस्वामी आणि त्यांच्या भावाला दोषी धरले होते.
कर्नाटकचे काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी हे वृत्त फेटाळले आहे. की जेडीएसने काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला आहे. जेडीएसने सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी प्रस्ताव दिल्याचे वृत्त होते. तर रविवारी डी के शिवकुमार यांनी सांगितले होते की, जेडीएसने सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच जेडीएसने सिद्धरामय्या, जी परमेश्वर यांच्यासह कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री बनविण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.
या प्रस्तावावर काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी आता पुन्हा परतण्य़ाची शक्यता नसल्याचे सांगितले. सिद्धरामय्यांना जरी मुख्यमंत्री बनविले तरीही परत येण्याचा विचार नसल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळला आहे. तसेच आता आमच्या आत्मसन्मानाला ठेच लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.