मुंबई - काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे कर्नाटकमध्ये सुरू झालेल्या राजकीय नाट्यामध्ये नवनवे अंक सादर होत आहेत. दरम्यान, मुंबईतील सोफीटेल हॉटेलात वास्तव्यास असलेल्या काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांची रवानगी मुंबईहून गोव्यात करण्यात आली आहे.
कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशन काही दिवसांवर आले असताना काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी विधानसभाध्यक्षांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिला होता. एकापाठोपाठ एक अशा 13 आमदारांनी राजीनामा दिल्याने काठावरच्या बहुमताने सत्तेवर असलेले कुमारस्वामी सरकार अडचणीत सापडले होते. दरम्यान, या बंडखोर आमदारांनी तडजोडीच्या सर्व शक्यता फेटाळून लावत मुंबईतील सोफिटेल हॉटेलात तळ ठोकला होता. काँग्रेस, जेडीएसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आज काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर आता जेडीएसच्या मंत्र्यांनी त्यांचे राजीनामे सुपूर्द केले आहेत. त्यामुळे लवकरच कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते. त्यामध्ये आमदारकीचा राजीनामा दिलेल्या नाराज आमदारांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११३ आमदारांची आवश्यकता आहे. परंतु, १३ आमदारांच्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामींच्या पाठीशी १०५ आमदारांचंच बळ आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. हे निमित्त साधून, काँग्रेसच्या काही नेत्यांनाही मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य भाजपा नेत्यांनीच कुमारस्वामी सरकार पाडण्याची खेळी रचल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. त्यावरून भाजपा-काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमकीदेखील उडत आहेत.