डालटोंगगंज (झारखंड) : झारखंडमधील काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-राष्ट्रीय जनता दल यांची पूर्वीची सरकारे ही स्वार्थी होती, अशा शब्दांत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ला करून आताही हे पक्ष सत्तेच्या लालसेने प्रेरित आहेत व जनतेकडे दुर्लक्ष करून राज्याचे शोषण करीत आहेत, असा आरोप केला. ते येथे निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.मोदी यांनी केंद्रात असलेल्या यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांवरही टीका केली. ते म्हणाले, काश्मीरचा गुंता आणि वादग्रस्त अयोध्या प्रश्न काँग्रेसमुळे वाढला. ही निवडणूक ही जे सेवा करू पाहत आहेत आणि जे लुटू पाहत आहेत त्यांच्यातील आहे. काँग्रेसकडे प्रश्न आहेत तर उत्तरे आमच्याकडे. त्यांच्याकडे आरोप तर आमच्याकडे केलेल्या कामाचे अहवाल, असे मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी ठासून सांगितले की, भाजप सामाजिक न्याय, स्थैर्य, सुशासन, समृद्धी आणि सगळ्यांना सन्मान व सुरक्षा या पाच तत्त्वांना बांधीलआहे.भाजपेतर सरकारांच्या राजकीय अस्थैर्यामुळे राज्यात नक्षलवाद बळावला, असे मोदी म्हणाले. सरकार मागच्या दाराने स्थापन केले जाते. स्वार्थी लोकांच्या आघाड्या केल्या जातात आणि त्यांची प्रेरणा असते सत्ताभोग, राज्याच्या संसाधनांची लूट, असे ते म्हणाले.मोदी म्हणाले, विरोधकांची नजर असते जमिनीच्या पोटात असलेल्या संपत्तीवर; पण ते जमिनीवर राहणाऱ्यांची काही काळजी करीत नाहीत. या परिस्थितीत जनतेला वीजपुरवठा करणे, रस्ते बांधणे व पाणी देणे हे कसे शक्य आहे, उद्योग कसे उभारले जातील?जल, जंगल आणि जमीन...आदिवासींच्या वनहक्कांचा मुद्दा उपस्थित करून मोदी म्हणाले, तुमचा जल, जंगल आणि जमिनीवरील हक्क सुरक्षित राखण्यास भाजप बांधील आहे.भाजपला दुसऱ्यांदा सत्तेत संधी देण्याचे आवाहन करून मोदी म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे झारखंडची वेगाने प्रगती होणे शक्य आहे.
काँग्रेस-झामुमो-राजदला सत्तेची लालसा, पंतप्रधान मोदी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 5:47 AM