नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दीड वर्षामध्ये पेट्रोल 36 रुपये आणि डिझेल 26.58 रुपयांनी महाग झाले आहे. सद्य:स्थितीत देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली असून, प्रमुख शहरांमध्ये डिझेलचा दरही 100 रुपये प्रतिलीटरपेक्षा जास्त झाला आहे. त्यातही अनेक शहरांमध्ये पेट्रोलची 110 रुपये अधिक दराने विक्री होत आहे. याच दरम्यान इंधन दरवाढीवरून विरोधक केंद्र सरकार जोरदार हल्लाबोल करत आहेत. याच दरम्यान वाढत्या महागाईवरून काँग्रेसने (Congress) पुन्हा एकदा मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
"फक्त भाजपाच्या लोकांचे उत्पन्न वाढले आहे, जनतेचे नाही" असं म्हणत सिब्बल यांनी टीका केली आहे. तसेच लोक हे सर्व पाहत असून ते या सरकारला काढून फेकून देतील असं देखील म्हटलं आहे. कपिल सिब्बल यांनी "भाजपाचे मंत्री म्हणतात की, उत्पन्न वाढले आहे. मात्र उत्पन्न जनतेचे वाढलेले नाही, तर फक्त त्यांचेच वाढले आहे. इंधन, घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. ते गरिबांबद्दल नाही विचार करत. ते फक्त धर्माचं राजकारण करतात, त्यांना जनतेची पर्वा नाही, मला आशा आहे की लोक या सरकारला काढून फेकून देतील आणि याची सुरुवात ही उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या पराभवाने होणार आहे" असं म्हटलं आहे.
"नरेंद्र मोदींच्या दाढीप्रमाणे वाढतेय महागाई; लोकांच्या ताटातील पदार्थ होताहेत कमी"
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ (Kamalnath) यांनी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) बोचरी टीका केली आहे. कमलनाथ यांनी वाढत्या महागाईची तुलना थेट पंतप्रधान मोदींच्या दाढीशी केली आहे. राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कमलनाथ बुरहानपुरला पोहोचले होते, यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. "जे लोक दिल्लीत दाढी वाढवून बसले आहेत, जसजसे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की त्यांची दाढी एक इंच वाढते. महागाई आता एवढी वाढली आहे की, त्याचा परिणाम आता जनतेच्या ताटात दिसून येत आहे. लोकांच्या ताटातील पदार्थ कमी कमी होत आहेत" असं म्हणत कमलनाथ यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
"सकाळपासून रात्रीपर्यंत खोटे बोलतात आणि जनतेची दिशाभूल करतात"
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर कमलनाथ यांनी निशाणा साधला. "शिवराजजींबद्दल मी सुरुवातीपासूनच म्हणत आलो आहे की, ते चांगले अभिनेते आहेत, चांगले कलाकार आहेत. त्यांना कलेची चांगली जाण आहे. ते सकाळपासून रात्रीपर्यंत खोटे बोलतात आणि जनतेची दिशाभूल करतात" असं म्हणत शिवराज सिंह चौहान यांना कमलनाथ यांनी सणसणीत टोला लगावला आहे. कोरोना महामारीमुळे कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. मात्र, त्याचा लाभ जनतेला मिळाला नाही. सरकारने मे 2020 मध्ये उत्पादन शुल्कामध्ये मोठी वाढ केली. राज्यांनीही व्हॅट वाढविला.