Congress Vs RSS: देशात एकीकडे लोकसभा निवडणूक आणि अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण या दोन विषयांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेसने भारत आणि चीनच्या तणावपूर्ण संबंधांवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि चीनचा संबंध काय, चीन राजदूतांनी मुख्यालयाला दिलेल्या भेटीचा अजेंडा काय, अशी विचारणा केली आहे.
काही वृत्तांनुसार चीन दूतावासातील काही मंडळींनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी या भेटीवरून प्रश्नांची सरबत्ती केली आहे. एक्सवर एक पोस्ट शेअर केली असून, RSS आणि चीनचा संबंध काय, असा सवाल केला आहे.
RSS आणि चीनचा संबंध काय? ‘त्या’ भेटीचा अजेंडा काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि चीनचा एकमेकांशी काय संबंध आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते आणि चिनी दूतावासाचे प्रतिनिधी यांच्या भेटीमागील अजेंडा काय होता? आपल्या सर्वांना अदानीच्या चीन संबंधांबाबत माहिती आहे आणि यात आता संघ आणि चिनी दूतावासातील काहींच्या भेटीची माहिती एका महिन्यानंतर बाहेर येत आहे. संघ आणि चीनचे असोसिएशन काय दर्शवतेय, यामुळेच चिनी मीडिया मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारचे कौतुक करत आहे का? जेव्हा चिनी लोकांनी २ हजार किमीचा भूभाग काबीज केला, जेव्हा परराष्ट्र मंत्रालय स्वतः कबूल करते की संबंध सामान्य नाहीत, तेव्हा भाजपची मातृसंस्था आरएसएस त्यांना का भेटत आहे? ही व्यवस्था चिनी संकटाचा सामना करण्यास योग्य नाही. परराष्ट्र मंत्र्याला वाटते की, चीन खूप मोठा आहे आणि आरएसएस त्यांचे आदरातिथ्य करत आहे. ही राष्ट्रीय सुरक्षेची गंभीर बाब आहे आणि याबाबत स्पष्ट शब्दांत उत्तरे द्यायला हवीत, अशी मागणी केसी वेणुगोपाल यांनी केली आहे.
दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनाला जावे की नाही, याबाबत विरोधकांमध्ये एकमत होत नसल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षातील अनेकांना या भव्य सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिरावरून विरोधक केंद्र सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहे.