काँग्रेसला बहुमतासाठी एक जागा कमी पडली तरी सत्ता आपलीच; भाजपाचा प्लॅन तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:18 AM2018-12-11T06:18:42+5:302018-12-11T06:19:27+5:30
राजस्थानच्या नेत्यांची अमित शहांकडे बैठक
- सुहास शेलार
जयपूर : जनतेचा कौल यंदा काँग्रेसचा बाजूने असल्याचे अंदाज एक्झिट पोलनी बांधला असला तरी भाजपाने विजयाची आशा सोडलेली नाही. त्यामुळे भाजपाने निकालाआधीच प्लॅन ‘बी’ आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या अंतर्गत टीमने केलेल्या सर्वेक्षणानुसार किमान ९० जागांवर विजय मिळण्याचा विश्वास त्यांना आहे. शिवाय १९९ पैकी जवळपास ६७ जागांवर बहुरंगी लढत असल्याने काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण असल्याचे भाजपाला वाटते. त्यामुळे काँग्रेसला बहुमतासाठी एक जरी जागा जरी कमी पडली तरी, अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या भाजपाच्या हालचालींनी वेग घेतला आहे.
एक्झिट पोलनुसार काँग्रेसला ४३.५, तर भाजपाला ४०.३७ टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीतील फरक केवळ तीन टक्क्यांचा असल्याने आपण बहुमताच्या जवळ पोहोचू शकतो. बहुरंगी लढतीतील मतांच्या ध्रुवीकरणामुळे भाजपाचे काही उमेदवार निवडून आले, तर बहुमताचा आकडाही पार होईल, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांना दिसत आहे.
भाजपाच्या मुख्यालयात १९९ जागांवरील प्रत्येक बुथवर झालेल्या मतदानाचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री वसुंधरा राजे, प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी, सरचिटणीस चंद्रशेखर आदी नेत्यांनी सर्व जिल्हा प्रमुख व तालुका प्रमुखांशी चर्चा करून मतदारांचा कौल जाणून घेतला. या चर्चेतून किमान ९० जागांवर भाजपाला विजय मिळण्याची अंदाज व्यक्त झाला. शिवाय जे अपक्ष उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, त्यांच्याशीही भाजपाने संपर्क साधला.
भाजपाच्या निवडणूक कोअर कमिटीने रविवारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मदनलाल सैनी, गजेंद्र सिंह शेखावत, अरुण राम मेघवाल, ओम माथुर यांचा सामावेश होता. एक्झिट पोलचे अंदाज व नेत्यांनी सादर केलेला बुथस्तरीय अहवाल याचा आढावा शहा यांनी घेतला. काँग्रेस व भाजपाच्या मतांत तीन टक्क्यांचाच फरक असल्याने काँग्रेसला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याची तयारी आतापासूनच ठेवा, अपक्षांना त्यासाठी आमिषे दाखवा आणि फितवा, असे अमित शहा यांनी सांगितल्याची चर्चा आहे.