नवी दिल्ली- गुजरातमधून उत्तर भारतीय पलायन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. गुजरातमधील परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं असून, देशातील व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कोसळल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. काँग्रेसच्या याच आरोपाला भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार भाजपानं केला आहे. तसेच गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेसचा हात आहे. राहुल गांधींना लाँच करण्यासाठी काँग्रेसनं उत्तर भारतीयांवर हल्ले चढवले, असा आरोप भाजपानं केला आहे.
काय आहे प्रकरण ?गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. त्यानंतर नेहमीच शांत, संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला. त्यामुळे युपी-बिहारी नागरिकांना गुजरात सोडून देण्याचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे गुजरातमधील 11 जिल्ह्यांत ही मोहीम तीव्र झाली असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याची माहिती आहे.