नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' येत्या १४ जानेवारीपासून मणिपूरमधून सुरू होणार आहे. या यात्रेदरम्यान देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी 'भारत जोडो न्याय यात्रे'चा लोगो आणि 'न्याय का हक मिलने तक' अशी टॅगलाईनही लाँच केली.
राहुल गांधी यांनी आपल्या एक्स हँडलवर 'भारत जोडो न्याय यात्रे'चा लोगो आणि टॅगलाईन असलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच, आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये राहुल गांधी यांनी लिहिले की, "आम्ही पुन्हा आपल्याच लोकांमध्ये येत आहोत, अन्याय आणि अहंकाराविरुद्ध - न्यायाच्या हाकेने. या सत्याच्या मार्गावर शपथ घेतो, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत यात्रा सुरूच राहील." दरम्यान, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ६७ दिवसांत ६७०० किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आम्ही १४ जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करणार आहोत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा मणिपूरमधील इम्फाळ येथून सुरू होणार असून देशातील १५ राज्यांतून मुंबईत संपेल. या यात्रेत ११० जिल्हे, १०० लोकसभेच्या जागा आणि ३३७ विधानसभा जागांचा समावेश असणार आहे. आता या यात्रेच्या मार्गात अरुणाचल प्रदेशचाही समावेश करण्यात आला आहे.
याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दावा केला होता की, भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या 'भारत जोडो यात्रा' इतकीच राजकारणात परिवर्तन करणारी ठरेल. भारत जोडो यात्रा गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली होती आणि ३० जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील लाल चौकात यात्रेचा समारोप झाला होता. ही यात्रा १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशात पोहोचली आणि यादरम्यान राहुल गांधींनी ४०० किलोमीटरहून अधिक अंतर कापले.