नवी दिल्ली - एकापाठोपाठ दोन काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खलनायक ठरवून दाखवणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी या संदर्भात मत मांडून काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच खलनायक ठरवून जगासमोर दाखवणे चुकीचे आहे. विरोधक त्यांना अयोग्य ठरवून त्यांची मदत करत असल्याचे मत अभिषेक मनू सिंघवी यांनी व्यक्त केले. याआधी माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे महत्त्व कमी करणे योग्य नाही. यातून काहीही साध्य होणार नसल्याचे म्हटले होते.
सिंघवी यांनी रमेश यांच्या ट्विटचा हवाला देत म्हटले की, मी नेहमीच सांगत आलोय मोदींना खलनायक ठरविणे योग्य नाही. केवळ ते देशाचे पंतप्रधान आहे म्हणून नव्हे तर असं केल्याने मोदींना मदत होते. कामाचे मुल्यांकन व्यक्त केंद्रीत नव्हे तर मुद्दांवर असावे. मोदींची उज्ज्वला योजना चांगली असल्याचे यावेळी सिंघवी यांनी सांगितले.
याआधी जयराम रमेश म्हणाले होते की, मोदींनी २०१४ ते २०१७ या कालावधीत केलेल्या कामांमुळे ते पुन्हा सत्तेत परतले. मोदी सरकार पूर्णपणे नकारात्मक नक्कीच नाही, असं त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले. मोदी सर्वसामान्यांना जोडणाऱ्या भाषेत बोलतात. मोदींनी अशी कामं केली जी मागील काळात झाली नाही. त्यामुळे जनता त्यांचं कौतुक करत आहे. हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही, तोपर्यंत या व्यक्तीविरुद्ध लढा देणे कठीण आहे. तसेच कायम त्यांना खलनायक ठरवल्याने त्यांचा मुकाबला करणे अशक्य असल्याचे रमेश यांनी नमूद केले होते.