“नरेंद्र मोदी नाही तर काय आता पाकिस्तानचे पंतप्रधान नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार का?”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 03:20 PM2023-05-25T15:20:29+5:302023-05-25T15:21:49+5:30
काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याने वेगळी भूमिका घेत पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.
New Parliament Inauguration row: २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. मात्र, या सोहळ्यापूर्वीच नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे, अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करत २० पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. यातच आता एका काँग्रेस नेत्याने वेगळी भूमिका घेत पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. नरेंद्र मोदी नाही तर काय आता पाकिस्तानचे पंतप्रधान नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार का, असा प्रश्न या काँग्रेस नेत्याने उपस्थित केला आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधक टीका करत असून, सत्ताधारी भाजप विरोधकांच्या टीकेचा समाचार घेत आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करण्याला विरोध केला आहे. मात्र, काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली आहे.
संसद, राष्ट्रपती भवन कोणत्याही पक्षाच्या मालकीच्या नाहीत
काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी संसदेच्या उद्घाटनावर प्रतिक्रिया देताना, संसद ही भारताच्या इतिहासाची परंपरा आहे. ती भाजपची परंपरा नव्हे. जर देशाच्या संसदेचे उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार नाही, तर काय पाकिस्तानचे पंतप्रधान येऊन ते करणार का? संसद, राष्ट्रपती भवन यांसारख्या वास्तू कोणत्याही पक्षाच्या मालकीच्या नाहीत. या वास्तू देशाची संपत्ती आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विचारांना विरोध केला पाहिजे. त्यांच्या निर्णयांचा विरोध केला पाहिजे. आम्ही सर्वजण मिळून तो करू. पण देशातील जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे. आम्हाला नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याचा अधिकार आहे, असे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नवीन संसद भवन उद्घाटनाच्या सोहळ्याला भाजपसह १७ पक्ष सहभागी होणार आहेत. तर २० विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनीही या प्रकरणी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.