Parliament Mansoon Session: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना गुरुवारी (10 ऑगस्ट) लोकसभेतून निलंबित करण्यात आले. जोपर्यंत प्रकरण विशेषाधिकार समितीकडे प्रलंबित आहे आणि चौकशी अहवाल येत नाही, तोपर्यंत त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान अधीर रंजन यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहात ठराव मांडताना सांगितले की, अधीर रंजन चौधरी प्रत्येक वेळी देशाची आणि सरकारची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतात. आम्ही माफीची मागणी केली होती, मात्र त्यांनी माफी मागितली नाही. त्यांच्या विरोधात एक ठराव मांडण्यात आला, जो सर्वांनी मान्य केला. अधीर रंजन चौधरी यांचे वर्तन सदनाशी सुसंगत नसल्याचे सभापती म्हणाले.
काँग्रेस नेत्याचा भाजपवर आरोपकाँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, यापूर्वी आपचे खासदार संजय सिंह आणि रिंकू सिंग यांना निलंबित करण्यात आले. आता अधीर रंजन चौधरी यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली. इंडिया आघाडीचा आवाज दाबण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, पण आम्ही मागे हटणार नाही. मणिपूरला पाठ दाखवली. आज संपूर्ण मणिपूर राज्य पंतप्रधानांच्या बोलण्यावर असमाधानी आहे.
अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळअधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ सुरू झाला. त्यावेळी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहात सांगितले की, पंतप्रधान हे उच्चाधिकारी आहेत. चौधरी यांनी माफी मागितली पाहिजे. पंतप्रधानांवर बिनबुडाचे आरोप मान्य करणार नाही. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी त्यांचे वक्तव्य रेकॉर्डबाहेर काढण्याचे निर्देश दिले.