नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने 2000 ची नोट चलनातून बाद केली आहे. या निर्णयावरुन काँग्रेस केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनीही यावर टीका करताना पीएम मोदींवर वादग्रस्त टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या ठीक नाही आणि अशा परिस्थितीत 2000 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. हा मोदी नसून पागल मोदी आहे, अशी टीका त्यांनी केली.
अधीर रंजन चौधरी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत आणि त्यांनी संसदेत अनेकवेळा सरकारवर टीका करताना तुम्ही ऐकले असेल. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधीर रंजन अनेकदा चर्चेत आले आहेत. आता त्यांच्या ताज्या वक्तव्यावरुन राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय घ्यायला नको होता.
अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या बैठका आणि तिसर्या आघाडीच्या शक्यतांबाबत म्हटले की, काँग्रेसशिवाय विरोधी पक्ष असू शकत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबतची बैठक पाटण्यातही निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ती बैठक दिल्लीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीने काहीही होणार नाही. त्यांनीही आमच्यासोबत यावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. 2024 मध्ये काही बदल होऊ शकतात, यासंदर्भात विरोधी पक्षांमध्येही चर्चेला सुरुवात झाली आहे.
28 मे रोजी संसद भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. विरोधी पक्षांनी ताकद दाखवण्यासाठी ही तारीख योग्य मानली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि विरोधी पक्ष नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती आहे. या दिवशी विरोधी पक्षांचे नेते एकत्र येऊन भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करतील. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा केली आहे. अलीकडेच त्यांनी दिल्लीत येऊन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.