Kapil Sibal On Congress : कपिल सिब्बल कोण, कुठचे नेते? अधीर रंजन, खर्गेंनी चांगलेच सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 02:02 PM2022-03-16T14:02:40+5:302022-03-16T14:04:29+5:30
Kapil Sibal On Congress :'घरची नाही, सर्वांची काँग्रेस' या सिब्बल यांच्या वक्तव्यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे.
Kapil Sibal On Congress : पाच राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना दिसतायत. काँग्रेसमध्ये सध्या दोन गट दिसत असून एक गट आपल्याच पक्षावर टीक करत आहे, तर दुसरा गट टीका करणाऱ्या नेत्यांनाच पराभवासाठी जबाबदार मानत आहे. 'घरची नाही, सर्वांची काँग्रेस' या सिब्बल यांच्या वक्तव्यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कपिल सिब्बल यांच्यावर निशाणा साधला. "ते एक चांगले वकील असू शकतात. परंतु चांगले नेते नाहीत. ते कधीही कोणत्याही गावात काँग्रेसचं काम करण्यासाठी गेले नाहीत. ते जाणूनबुजून पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाला कोणीही कमकुवत करू शकत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं," अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.
"त्यांना जनमत नाही"
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीदेखील सिब्बल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. "त्यांना कोणतंही जनमत नाही. ते कोण आणि कुठचे नेते आहेत, याची कल्पना नाही. ते काँग्रेसच्या समर्थनाशिवाय काहीही करू शकत नाहीत. आपल्या हिंमतीवर ते लढूही शकत नाहीत. अशात एसी खोलीत बसून मुलाखत देण्याचा काय अर्थ? जेव्हा ते युपीए सरकारमध्ये मंत्री होते, तेव्हा सर्वकाही चांगलं होतं. परंतु आता पक्ष सत्तेत नाही, तर त्यांना सगळंच वाईट दिसत आहे," असं ते म्हणाले.
He (Congress leader Kapil Sibal) should set an example that he can do something without the support of Congress, fight for his ideology on their own, otherwise what is the outcome of just giving interviews while sitting in an AC room: Congress leader Adhir Ranjan Chowdhury
— ANI (@ANI) March 16, 2022
काय म्हणाले होते सिब्बल?
"पक्षाचे नेतृत्व कोकीळेच्या धरतीवर (अर्थात सर्व काही ठीक आहे, असे वाटणे, पण वास्तविकतेशी संबंध नसणे.) जगत आहे. ८ वर्षांपासून पक्षाची सातत्याने घसरण होत असतानाही ते जागे होत नाहीत. ही काँग्रेससाठी दुर्दैवाची गोष्ट आहे," असं सिब्बल इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखीदरम्यान म्हणाले होते. "दुर्दैवाची गोष्ट आहे, की काही एबीसी लोकांना वाटते, की घरच्या काँग्रेसशिवाय सर्वांची काँग्रेस चालूच शकत नाही. आपल्यासाठी हेच आव्हान आहे. मी कोणत्याही एबीसीविरोधात नाही. मात्र, आपल्याला हे आव्हान स्वीकारावे लागेल," असेही त्यांनी नमूद केले.