नवी दिल्ली : संसदेत काल लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या मारल्या आणि घोषणाबाजी केली. यानंतर स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, सहाव्या आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र यादरम्यान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या हल्ल्याला सुरक्षेतील मोठी त्रुटी असल्याचे म्हटले आणि जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात जाण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सरकारच्या या घाईमुळे ही घटना यशस्वी ठरली. एवढी मोठी घटना घडली. यावर पंतप्रधान किंवा गृह मंत्रालयाने कोणतेही वक्तव्य केले नाही. जसे की यांना काही पडलेच नाही. देशाचे पंतप्रधान सिंघोल घेऊन संसदेच्या आत पूजा करतात, तरीही नवीन सभागृहाची ही अवस्था आहे. याबाबत पंतप्रधानांनी दुख: व्यक्त करायला हवे होते. पंतप्रधानांचा संसद भवनाशी काहीही संबंध नसल्याचे दिसते, असे म्हणत अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भातील मुद्दा आम्ही उपस्थित केला आहे. आम्ही घाबरत नाही, पण यावर चर्चा व्हायला हवी. पंतप्रधानांनी हनुमान बेनीवालजींसह त्या आरोपींचा सामना करणाऱ्या नेत्यांचेही कौतुक करायला हवे होते. मोदीजी खूप बोलतात, पण ते संसदेला सुरक्षा देऊ शकत नसतील तर ते देशाला सुरक्षा कशी देऊ शकतील. लोक बेरोजगार आहेत, असे आपण रोज म्हणतो. आज या हल्ल्यामागील एक कारण म्हणजे बेरोजगारी. मी कोणाचेही समर्थन करत नाही, पण हा सर्वसामान्यांचा संताप सभागृहात पोहोचला आहे, असेही अधीर रंजन चौधरी म्हणाले.
दरम्यान, संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींप्रकरणी दिल्ली पोलीस वेगाने कारवाई करत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ललित झा असे सहाव्या आणि फरार आरोपीचे नाव आहे. काल (दि.१३) लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. यानंतर स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. त्याचवेळी संसद भवनाबाहेर एका तरुण आणि तरुणीने स्मोक कँडल घेऊन निदर्शने केली. चार आरोपींपैकी एक अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा, मुलगी नीलम ही हरयाणातील जिंदची आणि सागर शर्मा हा यूपीतील लखनऊचा आहे. त्यांच्याकडे खासदार प्रताप सिम्हा यांचा व्हिजिटर पास होता. या घटनेत देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला.