माघार घेणे शरणागती पत्करण्यासारखे, पंतप्रधान मोदींमुळे जवानांचे मनोबल ढासळले; काँग्रेसची टीका
By देवेश फडके | Published: February 14, 2021 03:04 PM2021-02-14T15:04:55+5:302021-02-14T15:07:40+5:30
भारत आणि चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटानंतर काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी (ak antony) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटानंतर काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. (congress leader ak antony criticized modi government over india china border dispute)
एके अँटनी (ak antony) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारवर निशाणा साधला. लडाखमधील भारत आणि चीन सीमेवरून सैन्य माघारी बोलावणे हे शरणागती पत्करल्यासारखे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जवानांचे मनोबल ढासळले आहे, असा आरोप अँटनी यांनी केला.
For 1st time, India is facing two front war-like situation- one from Pak &now China becoming more belligerent by building infrastructure & military mobilisation across India-China border mainly from Eastern Ladakh, Arunachal& Sikkim: Congress leader & former Defence Min AK Antony pic.twitter.com/yO0qxcGldH
— ANI (@ANI) February 14, 2021
संरक्षण बजेटला कात्री
देशाच्या इतिहासात प्रथमच दोन्ही बाजूंच्या आव्हांना भारत तोंड देत आहे. एकीकडे पाकिस्तान सीमेवरून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तर दुसरीकडे विस्तारवादी धोरणामुळे चीन लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत सैन्य तैनात करत आहेत. असे असताना संरक्षण बजेटला कात्री लावण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षांत संरक्षण बजेट कमी करण्यात आले आहे. भारतीय सैन्याशी केलेली ही फसवणूक आहे, असा दावा अँटनी यांनी केला.
"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद
चीनसमोर शरणागती
भारतीय जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फिंगर-८ पर्यंत पेट्रोलिंग करत होते आणि चिनी सैन्य फिंगर-४ पर्यंत पेट्रोलिंग करत होते. यामधील भूभाग वादग्रस्त होता. यानंतर आम्ही कैलाश रेंजवरून माघार घेतली. भारतीय लष्कराची छावणी फिंगर ४ मध्ये असूनही आपण फिंगर ३ पर्यंतच पेट्रोलिंग करू शकतो. ही बाब चीनसमोर शरणागती पत्करल्यासारखी आहे, असा दावा अँटनी यांनी केला. पंतप्रधान मोदी सरकारने यासाठी काय पाऊले उचलली, असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा काही प्रदेश चीनला देऊन टाकला, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. भारत व चीन यांनी पूर्व लडाखमधून आपापले सैन्य मागे बोलाविण्यासंदर्भात नुकताच एक करार केला. त्यावर राहुल गांधी यांनी कोरडे ओढले. राहुल गांधी म्हणाले की, चीनबरोबर झालेल्या कराराची माहिती देताना राजनाथसिंह स्वत: संकोचले होते. भारतीय फौजा आता पूर्व लडाखमध्ये फिंगर ३ याठिकाणी तैनात करण्यात येतील, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. फिंगर ४ हे ठिकाण भारतीय हद्दीमध्ये येते. पूर्वी तिथे भारतीय लष्कराची चौकी होती.