नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर त्यांना दिल्ली येथील एम्सच्या ट्रामा सेन्टरमध्ये भर्ती करण्यात आले आहे. 88 वर्षीय मनमोहन सिंग यांनी कोरोना व्हायरस लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
मनमोहन सिंग यांनी रविवारी कोरोना संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी सरकारला अनेक सूचना दिल्या होत्या. सध्या मनमोहन सिंग हे स्वतःच कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पश्चिम बंगालच्या मुंख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेस नेते कमलनाथ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी वी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विट करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.
मोदिंना लिहिलेल्या पत्रात काय म्हणाले आहेत मनमोहन सिंग -डॉ. मनमोहन सिंग यांनी या पत्रामधून नरेंद्र मोदींना देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, कोरोना लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. कारण कोरोनाविरोधातील लढाईत ही बाब महत्त्वपूर्ण आहे. तसेच आतापर्यंत किती लोकांचे लसीकरण झाले आहे, त्याकडे लक्ष न देता एकूण लोकसंख्येपैकी कीती लोकांचे लसीकरण झाले आहे. यावर लक्ष केंद्रित करण्यात यावे. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लिहिलेले हे पत्र पी. चिदंबरम यांनी शेअर केले आहे.
सीडब्ल्यूसीच्या बैठकीतील चर्चेदरम्यान मिळालेले सल्ले या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवण्यात आले आहेत. पंतप्रधानांना लिलिहेल्या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लसीकरणामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
वेगवेगळ्या लसींबाबत सरकारचे काय आदेश आहेत. तसेच पुढच्या सहा महिन्यांमध्ये कोरोना लसीचा साठा मिळण्याबाबत काय परिस्थिती आहे, हे सरकारने सांगितले पाहिजे. तसेच विविध राज्यांना त्यांना अपेक्षित असलेला लशींचा साठा कसा मिळेल, हे केंद्र सरकारने पाहिले पाहिजे. तसेच राज्यांना फ्रंटलाइन वर्कर्सच्या श्रेणी परिभाषित करण्याची सूट दिली गेली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
भारत सरकारने लसनिर्मात्यांना काही अधिकच्या सवलती दिल्या पाहिजेत. इस्रायलप्रमाणे अनिवार्य लायसन्सिंगची व्यवस्था लागू केली पाहिजे. ज्या लसींना युरोपियन मेडिकल एजन्सीने किंवा यूएसएफडीएने मान्यता दिली आहे, अशा लसींची आयात करून त्या उपयोगात आणल्या पाहिजेत, असेही सिंग यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.