गरिबांना तांदूळ देताना द्वेषाचे राजकारण होऊ नये, असे अमित शहांना सांगितलंय - सिद्धरामय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 01:12 PM2023-06-22T13:12:05+5:302023-06-22T13:12:52+5:30
कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करून कॉंग्रेसने सत्ता मिळवली.
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव करून कॉंग्रेसने सत्ता मिळवली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस सरकारने भाजपच्या काळातील निर्णय बदलून केंद्रातील सत्ताधाऱ्यांना धक्का दिला. अशातच बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी अमित शहा यांना सांगितले आहे की गरिबांसाठी असलेल्या योजनेसाठी राज्याला तांदूळ पुरवताना द्वेषाचे राजकारण होऊ नये.
मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री शहा यांची भेट घेतली आणि राज्याच्या 'अन्न भाग्य' योजनेसाठी तांदूळ पुरवठ्याबाबत चर्चा केली. या योजनेच्या माध्यमातून बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त ५ किलो तांदूळ मिळणार आहेत. सिद्धरामय्या म्हणाले, "मी काल रात्री अमित शहांना भेटलो. मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की एफसीआयने तांदूळ पुरवठा करण्यास सहमती दर्शवली होती आणि या संदर्भात पत्र देखील लिहिले होते, परंतु दुसऱ्याच दिवशी अचानक त्यांनी सांगितले की, ते पुरवठा करू शकणार नाहीत. इथे राजकारण खेळले गेल्याचे दिसते. गरिबांना तांदूळ देण्याचा कार्यक्रम असल्याने यात द्वेषाचे राजकारण होता कामा नये."
१ जुलैपासून 'अन्न भाग्य' योजनेला प्रारंभ
नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शाह यांच्या भेटीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ते संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, सिद्धरामय्या आणि त्यांचे मंत्री मागील काही दिवसांपासून केंद्रातील भाजपच्या नेतृत्वातील सरकारवर 'अन्न महामंडळा'कडून राज्याला आवश्यक प्रमाणात तांदूळ मिळू नये यासाठी कट रचला गेला असल्याचा आरोप करत आहेत. पण कर्नाटक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, १ जुलैपासून 'अन्न भाग्य' योजना सुरू केली जाणार आहे.