नवी दिल्ली: वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी सातत्याने सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करत आहेत. आता ते भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असून त्यांची ही यात्रा ओडिशात आहे. अशातच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत बेरोजगारीच्या मुद्द्याला हात घातला. बेरोजगारीचा आजार देशभर पसरला असून प्रत्येक राज्य या आजाराने त्रस्त आहे. ओडिशाची आकडेवारी पाहता ४०% तरुण शिक्षण आणि कमाईपासून दूर आहेत, १ लाखाहून अधिक सरकारी पदे रिक्त आहेत आणि लाखो तरुण नोकऱ्यांच्या शोधात आहेत, असे राहुल गांधींनी म्हटले.
तसेच ओडिशातील ३० लाखांहून अधिक तरुण नोकरीच्या शोधात इतर राज्यात भटकत आहेत. मोदींचे मित्र नवीन पटनायक यांच्या आश्रयाने बाहेरून आलेले ३० अब्जाधीश उद्योगपती राज्याच्या संसाधनांची लूट करत आहेत. काँग्रेसने निर्माण केलेल्या रेल्वे, सेल, पोर्ट, एअरपोर्टसह देशातील मोठे सार्वजनिक उपक्रम आज मोदींच्या 'मित्र नीति'मुळे विकले जात आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.
राहुल गांधी आणखी म्हणाले की, GST मध्ये सुधारणा करून छोट्या उद्योगांसाठी नवीन आर्थिक मॉडेल तयार करणे, खासगीकरण थांबवणे, PSUs चे पुनरुज्जीवन करून रिक्त सरकारी पदे भरणे याला आमचे प्राधान्य असेल. काँग्रेसच्या या व्हिजनमुळे ओडिशासह संपूर्ण देशात रोजगार निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, राहुल गांंधींचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते कुत्र्याला बिस्किट खायला देताना दिसतात. यावर भाजपाने टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना गांधींनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले, "यात एवढे मोठे काय? जेव्हा त्या कुत्र्याला माझ्याकडे आणले तेव्हा तो पूर्णपणे भांबावलेला होता. तो थरथरत होता. मी त्याला बिस्कीट खायला दिले, त्याने खाल्ले नाही. म्हणून मी ते बिस्कीट त्या व्यक्तीला दिले आणि भाऊ तुम्हीच खाऊ घाला असे म्हणालो. यानंतर, कुत्र्याने ते बिस्किट खाल्ले. यावर भाजपाच्या लोकांना काय ऑब्जेक्शन आहे?."