काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; नेता आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, केला प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 02:15 PM2022-06-21T14:15:17+5:302022-06-21T14:16:28+5:30
काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. सोमवारी रात्री काँग्रेस पक्षातील दोन गटात हाणामारी झाल्यानंतर काँग्रेसमधील वादाची चर्चा रंगली आहे.
नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशातीलकाँग्रेसतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. नेते आणि कार्यकर्त्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पक्षात अनेकदा गटबाजी पाहायला मिळत असून हाणामारीचं हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात पोहोचलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिरमौर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. सोमवारी रात्री काँग्रेस पक्षातील दोन गटात हाणामारी झाल्यानंतर काँग्रेसमधील वादाची चर्चा रंगली आहे.
जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रुपेंद्र ठाकूर यांनी काँग्रेस नेते आणि पावटा येथील माजी आमदार किरनेश जंग यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत नाहन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे, किरनेश जंग यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्या दौऱ्यापूर्वी १२ जून रोजी सिरमौर काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद आता वाढत चालला आहे.
रुपेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते शिमल्याहून पक्षाच्या एका कार्यक्रमातून परतत असताना पावटा येथील माजी आमदाराच्या गाडीने त्यांचा पाठलाग केला. निहोगमध्ये माजी आमदार व त्याच्या साथीदारांनी त्यांना पकडलं. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजय बहादूर आणि इतर नेते माजी आमदारांच्या गाडीत बसले होते. निहोगजवळ त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं.
काँग्रेस नेते किरनेश जंग यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावताना म्हटले की, शिमल्याहून परतताना रूपेंद्र ठाकूर यांची भेटही घेतली नाही. त्यांना नाहानमध्ये थांबवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर हे सर्व राजकीय षडयंत्राखाली केले जात आहे. रुपेंद्र ठाकूर खरे असतील तर त्यांनी समोर यावं आणि त्यांना केव्हा आणि कुठे मारहाण झाली हे सिद्ध करावं असं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.,