मंत्रिपदासाठी काँग्रेस नेते दिल्लीत दाखल; पक्षश्रेष्ठींना आज भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 05:52 AM2019-12-23T05:52:28+5:302019-12-23T05:53:07+5:30
मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष थोरात
नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते रविवारी दिल्लीत दाखल झाले. गेल्या २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर अद्यापही राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. हिवाळी अधिवेशनासाठी सहा मंत्र्यांकडे विविध खात्यांचा तात्पुरता पदभार सोपविला आहे. मंत्रिमंडळाचा काही दिवसात विस्तार होईल. यात काँग्रेसचे ७ ते ८ सदस्य राहण्याची शक्यता आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्रीबाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्रीद्वय पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण यांनीही दिल्ली गाठली आहे.
मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष थोरात हे सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेस आमदारांशी चर्चा केली आहे.
राज्यात काँग्रेसचे ४४ आमदार असून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या दोघांना मंत्रीपद मिळाले आहे. पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांना स्थान दिल्यास नवोदितांना संधी मिळणार नाही. त्यामुळे या दोन ज्येष्ठ नेत्यांना वगळून मंत्रिमंडळात नवोदितांना अधिक स्थान द्यावे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. मात्र दोन्ही माजी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाल्याने ते मंत्रिमंडळात जाण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत मिळाले आहेत.
यांची नावे चर्चेत
मंत्रीपदासाठी विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड यांच्या नावांची चर्चा आहे.