Arvind Ladani : सौराष्ट्र : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हे धक्के बसत आहेत. गुजरातमध्ये अर्जुन मोढवाडिया, मुलू भाई कंडोरिया आणि अंबरीश डेर या तिघांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते अरविंद लडाणी सुद्धा भाजपाच्या वाटेवर आहेत. दरम्यान, सौराष्ट्रातील जुनागढ जिल्ह्यातील माणावदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले अरविंद लडाणी यांनी बुधवारी विधानसभेचा राजीनामा दिला. तसेच, अरविंद लडाणी यांनी भाजपामध्ये प्रवेश करून पोटनिवडणूक लढवण्याचा दावा केला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे आमदार एकापाठोपाठ एक कमी होत आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत राज्यातील काँग्रेसच्या आमदारांची संख्या मोठ्याप्रमाणात घटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी आमदार अंबरीश डेर यांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर बुधवारी राजुला येथे शक्तीप्रदर्शन केले होते. तर आमदार अरविंद लडाणी यांनी भाजपाचे अध्यक्ष सीआर पाटील यांची येथे भेट घेतली आणि त्यानंतर गांधीनगरमध्ये जाऊन विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
याआधी सीजे चावडा, अर्जुन मोढवाडिया यांसारख्या दिग्गज काँग्रेस नेत्यांनीही काँग्रेस सोडली आहे. विशेष म्हणजे, अरविंद लडाणी यांनी गेल्या निवडणुकीत राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री जवाहर चावडा यांचा माणावदर मतदारसंघातून पराभव केला होता. जवाहर चावडा २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले, नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर ते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले होते. दरम्यान, अरविंद लडाणी यांनी दावा केला आहे की, आपण लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असून माणावदरमधून पोटनिवडणूक लढवून पुन्हा आमदार होणार आहोत.
गुजरातमध्ये उद्या भारत जोडो न्याय यात्रा गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तिसिंह गोहिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा ७ मार्च रोजी दाहोद जिल्ह्यातील झालोद येथून गुजरातमध्ये दाखल होणार आहे. गुजरातमध्ये चार दिवसांच्या ४०० किलोमीटरच्या प्रवासात सभा, रॅली आणि जनसंपर्क करणार आहेत. तसेच, खासदार राहुल गांधी सरदार पटेलांनी स्थापन केलेल्या बारडोली स्वराज आश्रमाला भेट देणार आहेत.