जयपूर : ह्यहम जानते थे की ये निकम्मा है, नकारा है, कोई काम नही कर रहा है. खाली लोगोंको लडा रहा हैह्ण, अशा बोचऱ्या शब्दांत व्यक्तिगत हल्ला चढवून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारणारे पदच्युत उपमुक्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी दिलजमाई होणे अशक्य असल्याचे सोमवारी पुन्हा एकदा दाखवून दिले. पत्रकारांशी बोलताना गेहलोत म्हणाले की, पायलट यांचे हे उद्योग सुरु होते तरी पक्षाच्या हितासाठी मी गप्प बसलो. पण मी काही इथे भाजी विकायला आलेलो नाही. मी मुख्यमंत्री आहे.
गेहलोत पुढे म्हणाले की, गेल्या सात वर्षांत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बदलण्याची मागणी झाली नाही, असे राजस्थान हे देशातील एकमेव राज्य आहे. सरकार पाडण्याची कारस्थाने सुरु आहेत, असे पायलट सांगत असायचे. पण निरागस चेहरा, इंग्रजी व हिंदीवर प्रभुत्व आणि माध्यमांमध्ये उत्तम वजन असले पायलटच हे उद्योग करत असतील, असे (त्यावेळी) कोणाच्या मनातही आले नव्हते. प्रदेश पक्षाच्या अध्यक्षाने स्वत:च्याच पक्षाचे सरकार पाडण्याचे उद्योग करावे, असे इतिहासात पूर्वी कधीही ़घडले नसेल. पायलट यांनी डांबून ठेवलेले काही आमदार पुन्हा आमच्याकडे येऊ इच्छितात. पण फोन काढून घेतल्याने ते रडत असतात, असा दावाही गेहलोत यांनी केला.
पायलट यांनी ३५ कोटी देऊ केल्याचा आरोप
आपल्यासोबत बंडखोरी करून भाजपामध्ये येण्यासाठी सचिन पायलट यांनी आपल्याला ३५ कोटी रुपयांची ह्यआॅफरह्ण दिली होती, असा अरोप काँग्रेसचे आमदार गिरीराज सिंग यांनी केला. तो साफ फेटाळून लावताना पायलट यांनी म्हटले की, याने मला दु:ख झाले, पण आश्चर्य वाटले नाही. कारण बदनाम करून माझी विश्वासार्हता संपविण्याच्या कारस्थानाचाच हा भाग आहे. मुख्य विषयाला बगल देण्यासाठीच हे केले जात आहे.