ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी करणा-या काँग्रेसवर सुषमा स्वराज यांनी पलटवार केला आहे. कोळसा घोटाळ्यातील आरोपी संतोष बगरोदिया यांना राजनैतिक पासपोर्ट मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दबाव टाकला होता असा गौप्यस्फोट सुषमा स्वराज यांनी केला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्या राजीमानाम्याची आग्रही मागणी केली होती. बुधवारी सकाळी सुषमा स्वराज यांनी ट्विटरव्दारे विरोधकांना प्रत्युत्तर दिले. 'कोळसा घोटाळ्यातील आरोपी संतोष बगरोदिया यांना पासपोर्ट मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दबाव टाकला होता, या नेत्यांचे नाव संसदेत जाहीर करु' असा गौप्यस्फोट सुषमा स्वराज यांनी केला आहे. सुषमा स्वराज यांच्या ट्विटमुळे खळबळ माजली असून काँग्रेसचा मोठा नेता कोण याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.