...तर काँग्रेस हवं ते पाऊल उचलेल; मविआबाबत बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 12:10 PM2022-10-26T12:10:32+5:302022-10-26T12:11:16+5:30
भाजपाची कार्यपद्धती सर्वजण अनुभवतोय. आम्हाला ती मान्य नाही असं थोरातांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध शिंदे-भाजपा असं चित्र पाहायला मिळेल. मात्र काँग्रेस मविआसोबत राहणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. भाजपाला कुठल्याही प्रकारे संधी मिळणार नाही हा प्रयत्न काँग्रेस करेल असं थोरातांनी म्हटलं.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, भाजपाची कार्यपद्धती सर्वजण अनुभवतोय. देशात प्रत्येकाला ती माहिती आहे. ती कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही. त्यामुळे भाजपाला दूर ठेवण्यासाठी हवे ते पाऊल उचलू. भाजपाला कुठल्याही प्रकारे संधी मिळणार नाही असा प्रयत्न काँग्रेस करेल असं सांगत मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस मविआच्या माध्यमातून निवडणूक लढणार का या प्रश्नाला उत्तर दिले.
मल्लिकार्जुन खरगे अनुभवी नेते
मल्लिकार्जुन खरगे हे ब्लॉक अध्यक्षापासून काँग्रेस अध्यक्षापर्यंत पोहचले आहेत. त्यांनी आयुष्याची ५० वर्ष संसदीय कार्यात वाहिली आहेत. खूप अनुभवी नेतृत्व आहे. संपूर्ण देशात ते परिचयाचे आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी राहिले आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या इच्छेनुसार निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्षाची निवड झाली. त्यामुळे निश्चित काँग्रेसला नक्की उभारी मिळेल असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
भारत जोडो यात्रेत शरद पवार, उद्धव ठाकरे?
भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात येईल. १४ दिवस यात्रा राज्यात असेल. जनता यात्रेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. आम्ही शरद पवार, उद्धव ठाकरे यांना वैयक्तिक निमंत्रण दिले आहे. ते यात्रेच्या काही भागात सहभागी होतील असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांपर्यंत कुठलीही मदत पोहचली नाही
आम्ही कायम शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आम्ही २ लाखापर्यंत कर्ज माफ केले. नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान दिले. दुदैवाने आता कुठलीही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही असं सांगत बाळासाहेब थोरातांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"