"यांना शक्य झालं तर संसदही विकतील"; काँग्रेस नेत्याची अर्थसंकल्पावरून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 04:03 PM2021-02-02T16:03:39+5:302021-02-02T16:08:03+5:30
नफ्यात असणाऱ्या सरकारी बँका, एलआयसीसारख्या विमा कंपन्या खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयास असल्याच्याही विरोधकांची टीका
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सोमवारी डिजिटल पद्धतीने सादर केला. प्रथमच अर्थमंत्री सीतारमन यांच्या हातामध्ये अर्थसंकल्पाची सुटकेस नव्हती तर लॅपटॉप होता. अशा पद्धतीने अर्थसंकल्प सादर करण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा, कोरोना लसीकरण, मेट्रो प्रकल्प, जलजीवन मिशन अशा योजनांवर भर दिला आहे. मात्र सर्वसामान्यांनाची निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ग्रामीण उद्योग, रोजगार, शिक्षण अशा बाबी दुर्लक्षित झाल्या आहेत. पेट्रोल-डिझेलवर अधिभार, नफ्यात असणाऱ्या सरकारी बँका आणि एलआयसीसारख्या विमा कंपन्या खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा हा प्रयास असल्याच्याही टीका विरोधकांकडून होत आहेत. अशातच काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी या अर्थसंकल्पावरून केंद्रावर निशाणा साधला आहे.
"हा देशाचा अर्थसंकल्प आए की OLX ची जाहिरात. यांना शक्य झालं तर हे संसददेखील विकतील," असं म्हणत भाई जगताप यांनी केंद्र सकरावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली. यावेळी त्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरूनही केंद्रावर टीकेचा बाण सोडला. "एकीकडे पेट्रोल डिझेल वरची एक्ससाईज ड्युटी कमी केली आणि दुसरीकडे दुसरीकडे तेव्हढाच पेट्रोलवर २.५० रुपये आणि डिझेल ४.०० रुपये कृषी सेस लावला. ६५ वर्षात ६५ रुपयांना मिळणारे पेट्रोल ६५ महिन्यांत शंभरी जवळ गेलंय, हाच का तो विकास?," असा सवालही त्यांनी केला.
ये देश का बजट है या OLX की Ad!
— Bhai Jagtap - भाई जगताप (@BhaiJagtap1) February 1, 2021
इनका बस चले, तो संसद भी बेच देंगे #Budget2021
एकीकडे पेट्रोल डिझेल वरची excise duty कमी केली आणि..
— Bhai Jagtap - भाई जगताप (@BhaiJagtap1) February 1, 2021
दुसरीकडे दुसरीकडे तेव्हढाच कृषी cess पेट्रोल ₹२.५०/डिझेल ₹४.०० वर लावला..!!#Budget2021
चिदंबरम यांच्याकडूनही टीका
अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही या संकटाचा परिणाम झाला, परंतु त्यातूनही आपण चांगले पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानं भारतातील प्रत्येकाला त्यांच्यात असलेल्या ताकदीची आठवण करून दिली.'', असे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं होतं. यासंदर्भात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सीतारामन यांची अर्थसंकल्पातील बॅटींग कशी होती?. त्यावर, चिदंबरम यांनी मजेशीर उत्तर देत टोला लगावला. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीतील टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला होता. भारत ०-१ असा पिछाडीवर होता, त्यावेळी भारतीय संघाची मोठी नाचक्की झाली होती. सर्वच स्तरातून भारतीय संघावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे, चिदंबरम यांनी निर्मला सीतारामन यांची बॅटींगही अॅडलेड कसोटीतील ऑल आऊट ३६ प्रमाणे होती, असं म्हणत टोला लगावला.