लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारत बायोटेक या कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेच्या सहकार्याने बनविलेल्या कोवॅक्सिन लसीमध्ये गायीच्या वासराचा रक्तद्राव आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते गौरव पांधी यांनी केला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत त्यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला केंद्राकडून जे उत्तर मिळाले त्याचा आधार घेऊन पांधी यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या आरोपांचा केंद्र सरकारने ठाम शब्दांत इन्कार केला आहे.
गौरव पांधी यांनी माहिती अधिकाराखालील प्रश्नाला केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) जे उत्तर दिले त्याची प्रतही टि्वटरवर झळकवली आहे. पांधी यांनी दावा केला की, कोव्हॅक्सिन लसीमध्ये नवजात वासराचा रक्तद्राव आहे हे मोदी सरकारने मान्य केले. वीस दिवसांहून कमी वयाच्या वासरांची कत्तल करून त्यांचा रक्तद्राव लस बनविण्यासाठी वापरला आहे. हे अत्यंत भीषण कृत्य आहे. सीडीएससीओने म्हटले, व्हिरो पेशींच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेसाठी हा रक्तद्राव वापरला जातो. कोव्हॅक्सिन बनवितानाच्या प्रयोगांत कोरोना विषाणू निर्मितीत रक्तद्राव वापरण्यात आला, अशी माहिती भारत बायोटेकने आम्हाला दिली आहे.
ही जगन्मान्य पद्धतीकेंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे की, व्हिरो पेशींचे पुनरुज्जीवन करण्यासाठीच नवजात वासराच्या रक्तद्रावाचा वापर करण्यात येतो. विविध प्राण्यांचे रक्तद्राव या प्रक्रियेसाठी वापरले जातात. ही जगन्मान्य पद्धती आहे. संभ्रमाला धार्मिक रंग? शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पांधी यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करा, असे सांगणारे लोकच आता माहिती अधिकारातील प्रश्नाला मिळालेल्या एका उत्तरावर विसंबून निरर्थक आरोप करीत आहेत.