नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष एकमेकांविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. त्यातूनच नेत्यांची वादग्रस्त विधाने समोर येत आहे. गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना आपत्तीजनक विधान केलं. मंगळवारी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना केवळ गाढवाची छाती 56 इंचाची असते असं वादग्रस्त विधान केलं.
अर्जुन मोढवाडिया यांना बनासकंठा जिल्ह्यातील दीसा येथे एका रॅलीत हे वक्तव्य केले आहे. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्याकडून देश चालविण्यासाठी 56 इंच छातीची गरज असते असं विधान केलं होतं त्यावरून अर्जुन मोढवाडिया यांनी मोदींवर टीका केली आहे.
काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनी आपल्या भाषणात बोलताना एका सामान्य व्यक्तीची छाती 36 इंच असते, बॉडी बिल्डर व्यक्तीची छाती 42 इंच असू शकते. फक्त गाढवाची छाती 56 इंच असते तर बैलाची छाती 100 इंच असते असं सांगितले. त्याचसोबत मोदीभक्त ही गोष्ट समजू शकत नाहीत, जेव्हा कोणी त्यांच्या नेत्याला 56 इंच छातीचा नेता म्हणतं तेव्हा ते आनंदी होतात असा टोलाही अर्जुन मोढवाडिया यांनी भाजपाला लगावला.
अर्जुन मोढवाडिया यांच्या विधानावर भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. पराभवाच्या भितीने काँग्रेसच्या नेत्यांचे मानसिक संतूलन बिघडत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून अशाप्रकारे शब्दप्रयोग केले जात आहे. काँग्रेस नेत्यांच्या अशा वक्तव्याचा आणि पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या भाषेचा राज्यातील जनता मतदानातून योग्य ते उत्तर देईल असा विश्वास भाजपाचे प्रवक्ते भरत पांड्या यांनी सांगितले. मागील लोकसभा निवडणुकीवेळी उत्तर प्रदेशात एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 56 इंच छातीचा भाषणात उल्लेख करण्यात आला होता. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांच्याविरोधात भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी या शब्दाचा वापर केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी गुजरातमधील सर्व 26 जागांवर मतदान होणार आहे.