VIDEO : हातात माईक, खाली वाकला अन्...; पत्रकारांशी बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 08:19 PM2024-08-19T20:19:18+5:302024-08-19T20:32:04+5:30

कर्नाटकात पत्रकार परिषदेत बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

Congress leader dies of heart attack while speaking during press conference | VIDEO : हातात माईक, खाली वाकला अन्...; पत्रकारांशी बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू

VIDEO : हातात माईक, खाली वाकला अन्...; पत्रकारांशी बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू

Karnataka Congress :  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जमिनीशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात होणारी अटकेची कारवाई टळली असली तरी त्यांना मोठा धक्का बसला आहे. राज्यपालांनी दिलेल्या या आदेशानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अटक होण्याची शक्यता होती. त्यामुळे  कर्नाटकतील राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी संबधित एका पत्रकार परिषदेत बोलत असताना काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्रकार परिषदेत बोलत असतानाच अचानक काँग्रेस नेत्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दुःखद घटनेची माहिती दिली.

कर्नाटक राज्य मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक संघटनेचे सदस्य सीके रविचंद्रन यांचे सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान निधन झाले. राज्यपालांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ बेंगळुरू प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. मात्र पत्रकारांशी बोलत असतानाच सीके रविचंद्रन यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या घटनेबाबत एक्स पोस्टवरुन दुःख व्यक्त केलं. “कर्नाटक राज्य मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक संघटनेच्या वतीने राज्यपालांच्या खटल्याच्या आदेशाविरोधात बेंगळुरू प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत असताना संघटनेचे सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ता सीके रविचंद्रन यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढ्यात आमचे साथीदार असलेले रविचंद्रन यांच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना करतो. त्यांच्या दु:खाच्या वेळी मी त्यांचे कुटुंबीयांसोबत आहे,” असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

सीके रविचंद्रन हे काँग्रेसच्या प्रचार समितीचे सदस्य होते. म्हैसूर जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास राज्यपालांनी परवानगी दिल्याच्या विरोधात ते बंगळुरु येथे प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. पोलिसांनी सांगितले की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रविचंद्रन यांना उपचारासाठी कनिंगहॅम रोडवरील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जमीन वाटपातील कथित घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात चौकशीला मंजुरी दिल्याने सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते सोमवारी रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा मुख्यालयावर ठिय्या मांडला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप नेत्यांनी आंदोलने केली. दुसरीकडे कर्नाटक हायकोर्टाने या प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा दिला असून पुढील आदेशापर्यंत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title: Congress leader dies of heart attack while speaking during press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.