भोपाळ: आपल्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन राजकीय घमासान होण्याची चिन्हे आहेत. भगवे वस्त्र घालून बलात्कार होत आहेत आणि मंदिरांमध्ये बलात्कार होत आहेत. आपल्या सनातन धर्माला ज्यांनी बदनाम केले, त्यांना देव सुद्धा माफ करणार नाही, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
दिग्विजय सिंह म्हणाले, "व्यक्ती आपले कुटुंब सोडून साधू बनतो. धर्माचे आचरण करतेवेळी आध्यात्माकडे वळतो. मात्र, आज लोक भगवे वस्त्र घालून चूर्ण वाटत आहेत. भगवे वस्त्र घालून बलात्कार होत आहेत. मंदिरांमध्ये बलात्कार होत आहेत. हा आपला धर्म आहे का? आपल्या सनातन धर्माला ज्यांनी बदनाम केले आहे. त्यांना देव सुद्धा माफ करणार नाही."
'जय श्रीराम नाऱ्यावर एका पार्टीने ताबा घेतला आहे' जय श्रीराम नाऱ्यावर एका पार्टीने ताबा घेतला आहे. त्यामुळे आपल्याला जय सिताराम म्हटले पाहिजे, असे सांगत दिग्विजय सिंह यांनी भाजपावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. पार्टीचे लोक मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये ताबा घेत आहेत, असेही दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
'भाजपाने आम्हाला राष्ट्रीयतेचा धडा शिकवू नये' आमची विचारसरणीची लढाई भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासोबत आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कधीच भाग घेतला नाही. ते आम्हाला राष्ट्रीयतेचा धडा शिकवू पाहत आहेत, दिग्विजय सिंह म्हणाले. तसेच, 1947 च्या आधी हे लोक कोठे होते? ज्यावेळी इंदिरांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले, त्यावेळी हे लोक कोठे होते? असा सवाल करत आम्हाला राष्ट्रीयतेचा धडा शिकवण्याची गरज नसल्याचे सांगत दिग्विजय सिंह यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.