भोपाळ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे कट्टर विरोधक मानले जातात. मात्र दिग्विजय सिंह यांनी बुधवारी असं एक विधान केलं ज्यावर क्षणभर कुणाचाही विश्वास बसला नाही. दिग्विजय सिंह यांनी सार्वजनिक मंचावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. संघ आणि भाजपावर नेहमीच टीका करणाऱ्या दिग्विजय सिंह यांच्या तोंडून कौतुक ऐकून ऐकणारे अवाक झाले. मात्र त्यांनी हे कौतुक त्यांच्या नर्मदा परिक्रमेदरम्यान संघ आणि भाजपाने केलेल्या सहकार्यासाठी केले. (Congress leader Digvijay Singh praised Amit Shah & RSS)
भोपाळमध्ये नर्मदा परिक्रमेवर लिहिलेल्या पुस्तकाच्या अनावरणाच्या कार्यक्रमामध्ये दिग्विजय सिंह यांनी अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा केली. पुस्तक अनावरण कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, जेव्हा माझी यात्रा गुजरातमधून जात होती तेव्हा अमित शाह यांनी फॉरेस्ट ऑफिसरना सांगून रेस्ट हाऊसमध्ये माझी व्यवस्था केली. दिग्विजय सिंह यांनी सांगितले की ते अमित शाह यांचे सर्वात मोठे टीकाकार आहेत. मात्र असे असूनही त्यांनी फॉरेस्ट ऑफिसरना सांगून माझ्या यात्रेत कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले. अमित शाह आणि माझी कधी थेट भेट झालेली नाही. मात्र या सहकार्यासाठी मी त्यांचे आभार मानले होते. राजकीय सामंजस्याचे हे उदारहण आहे. आम्ही कधी कधी ही बाब विसरतो, असेही दिग्विजय सिंह पुढे म्हणाले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत दिग्विजय सिंह म्हणाले की, संघासोबत माझे विचार जुळत नाहीत. मात्र या यात्रेदरम्यान, संघाचे लोक मला भेटण्यासाठी येत असत. संघाच्या कार्यकर्त्यांना मला भेटण्यासाठी आदेश मिळत होते. त्यांच्याकडूनही माझी व्यवस्था झाली. संघाचे कार्यकर्ते कर्मठ असतात. मात्र त्यांच्या देशाचे विभाजन करणाऱ्या विचारांचे मी समर्थन करत नाही. त्यामुळे संघाला माझा वैचारिक विरोध आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी २०१७-१८ मध्ये नर्मदा परिक्रमा केली होती. त्यावेळी त्यांचे सहकारी असलेले त्यांचे वैयक्तिक सचिव ओमप्रकाश शर्मा यांनी नर्मदा पथिक नावाचे एक पुस्तक लिहिले होते. त्याच पुस्तकाचे अनावरण गुरुवारी मध्य प्रदेश विधानसभेच्या मानसरोवर सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तन्खा, सुरेश पचौरी यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.