130 कोटी जनता हिंदूच या वक्तव्याप्रकरणी मोहन भागवतांविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 08:47 PM2019-12-30T20:47:22+5:302019-12-30T20:52:44+5:30
'मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता'
हैदराबाद : काँग्रेसचे वरिष्ठ नेता व्ही. हनुमंता राव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मोहन भागवत यांनी 130 कोटी भारतीयांना हिंदू म्हणून लोकांच्या भावनांचा अवमान केला आहे, असे व्ही. हनुमंता राव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून हे हैदराबादमधील कायदा-सुव्यवस्थेसाठी योग्य नाही, असे व्ही. हनुमंता राव यांनी म्हटले आहे.
येथील एलबी पोलीस ठाण्यात व्ही. हनुमंता राव यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रेड्डी यांनी या तक्रारीबाबत दुजोरा दिला आहे. काँग्रेस नेते व्ही. हनुमंता राव यांच्याकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, याप्रकरणी खटला दाखल होऊ शकतो की नाही, याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याची माहिती अशोक रेड्डी यांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदुत्वासंदर्भात मोठे वक्तव्य केले होते. संघाच्या दृष्टीकोनातून देशातील 130 कोटी जनता हिंदूच आहे. देशातील लोकांची धर्म आणि संस्कृती काहीही असो ते हिंदूच आहेत, असे विधान मोहन भागवत यांनी केले होते. तसेच, जे लोक राष्ट्रवादी आहेत. भारतीय संस्कृतीचा सन्मान करतात ते सर्व हिंदू आहेत. संपूर्ण समाज आपलाच असून सर्वांना एकत्र करण्याची संघाची इच्छा आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले होते. ते हैदराबाद येथील विजय संकल्प कार्यक्रमात बोलत होते.