काँग्रेसच्या 'जी-२१'नेत्यांनी आता पक्षात 'सामुहिक आणि समावेशी नेतृत्वा'ची मागणीची तयार केली आहे. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 'जी-२१' नेत्यांच्यावतीनं गुलाम नबी यांनी आज सोनियांसमोर आपली बाजू मांडल्याचं बोललं जात आहे. गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांना पराभूत करण्यासाठी एकजूट होऊन पुन्हा लढण्याबाबत झाल्याची माहिती दिली.
"सोनिया गांधींसोबतची भेट चांगली झाली. काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांनी एकमताने त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे असा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे फक्त काही सूचना होत्या त्या फक्त शेअर केल्या आहेत", असं गुलाम नबी आझाद म्हणाले. सोनिया गांधी यांची भेट घेण्यापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. गुलाम नबी आझाद यांच्या काँग्रेस अध्यक्षांच्या भेटीच्या एक दिवस आधी, या गटाचे सदस्य भूपिंदर सिंग हुडा यांनी गुरुवारी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. सुमारे तासाभराहून अधिक काळ चाललेल्या राहुल गांधी यांच्या भेटीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि पक्ष मजबूत करण्याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हरियाणातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी हुड्डा यांना फोन केला होता.
याआधी बुधवारी 'G-21' च्या नेत्यांची डिनरवर बैठक झाली होती. 'जी-21' नेत्यांनी पक्षात संघटनात्मक बदल आणि सामूहिक नेतृत्वाची मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर या गटाची सक्रियता वाढली आहे. त्यातील आणखी एक प्रमुख सदस्य कपिल सिब्बल यांनी अलीकडेच एका मुलाखतीत गांधी घराण्याने काँग्रेसचे नेतृत्व सोडून दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी, असे म्हटले होते. यानंतर गांधी कुटुंबाच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या काही नेत्यांनी सिब्बल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.