नवी दिल्ली-
उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका स्थगित करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी दिल्ली हायकोर्टात निवडणूका स्थगित करण्याची मागणी केली. यात कोरोना परिस्थिती लक्षात घेता निवडणुका रद्द करण्याची मागणी शर्मा यांनी केली. पण कोर्टानं शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे. तसंच तुम्ही काय मंगळ ग्रहावर राहता का? कारण इथं तर कोरोना रुग्णसंख्या घटताना दिसत आहे, असंही कोर्टानं फटकारलं आहे.
न्यायाधीश विपिन सांघी आणि जसमीत सिंह यांच्या खंडपीठानं जगदीश शर्मा यांच्या याचिकेवर नाराजी व्यक्त केली. "तुम्ही काय मंगळावर राहता का? दिल्लीत तर आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. एकतर तुम्ही याचिका स्वत:हून मागे घ्या नाहीतर आम्ही फेटाळून लावतो", असं रोखठोक मत न्यायाधीशांनी व्यक्त केलं. त्यानंतर जगदीश शर्मा यांनी आपली याचिका मागे घेतली आहे.
काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काही आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. तसंच ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा याबाबतचा आराखडा सादर करण्याचे निर्देश कोर्टानं सरकारला द्यावेत अशीही मागणी त्यांनी याचिकेतून केली होती.
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक १० फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ७ मार्चपर्यंत निवडणूक कार्यक्रम होणार आहे. तर १० मार्च रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगानं देशातील प्रमुख राजकीय पक्षांसोबत देखील चर्चा केली होती. या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांनी ठरलेल्या वेळेतच निवडणूक व्हावी अशी मागणी केली होती. कोणत्याही पक्षानं निवडणूक रद्द करण्याची भूमिका घेतलेली नाही.