वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख, रणवीर यांच्यासह बॉलिवूडचे स्टार्स अन् दीड लाख प्रेक्षकांच्यासमोर ऑस्ट्रेलियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्नांचा चुराडा केला. रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारतावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला.
ट्रॅव्हिस हेडने मॅच विनिंग शतकी खेळी केली आणि त्याला मार्नस लाबुशेनची दमदार साथ मिळाली. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वन डे वर्ल्डकप उंचावला. त्यामुळे १२ वर्षानंतरही भारताची वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा अपूर्ण राहिली. दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने निशाणा साधला आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्राधान्यक्रम स्पष्ट आहेत. त्यांच्याकडे मणिपूरला जाण्यासाठी वेळ नाही, पण क्रिकेट सामना पाहण्यासाठी पूर्ण वेळ आहे'', असा टोला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. रविवारी रात्री भारत-ऑस्ट्रेलिया सामना संपल्यानंतर जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधानांनी अहमदाबादमधील त्यांच्या नावाच्या स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी वेळ काढला. आता (उद्यापासून) ते राजस्थान आणि तेलंगणात जाऊन काँग्रेसला शिव्या घालतील, पण तरीही त्यांना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही, तिथे अजूनही तणाव आहे.
याचबरोबर, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीम इंडियाचे चांगले खेळ केल्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले की, संपूर्ण विश्वचषकातील तुमच्या (भारतीय क्रिकेट संघाच्या) कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही टीम इंडियाचे कौतुक केले. ते म्हणाले, "टीम इंडिया, तुम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली! जिंका किंवा हरा- आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमच्यावर प्रेम करतो आणि आम्ही पुढील वर्ल्डकप जिंकू."
याशिवाय, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी पंतप्रधानांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये ते हसत आहेत. यावरून सुप्रिया श्रीनेट यांनी निशाणा साधसा आहे. त्या म्हणाल्या, "आमच्या टीमच्या डोळ्यात अश्रू आहेत, देशाचे हृदय तुटले आहे, पण ते (पीएम) इतके का हसत आहेत."