नवी दिल्ली - काँग्रेसला गुडबाय करत भाजपत प्रवेश केलेल्या जितिन प्रसाद (Jitin prasada) यांना मोठे बक्षीस मिळू शकते. भजपकडून त्यांना विधान परिषदेवर पाठविले जाऊ शकते. पक्षातील उच्च पदावरील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय त्यांना, उत्तर प्रदेश भाजप अथवा राष्ट्रीय स्तरावरही संघटनेत मोठे पद मिळण्याची शक्यता आहे.
भाजपत प्रवेश केल्यानंतर जितिन प्रसाद यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयलही उपस्थित होते. पीयूष गोयल यांनीच प्रसाद यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे.
भाजपने मला सन्मान दिला - जितिन प्रसादभाजपत सामील झाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले. ते म्हणाले भाजपने मला सन्मान दिला. आज देशात खऱ्या अर्थाने भाजप हाच एकमेव संस्थात्मक राजकीय पक्ष आहे.
जितिन प्रसाद म्हणाले, ''मी गेल्या 8-10 वर्षांत अनुभवले आहे, की आज देशात केवळ भाजप हाच खऱ्या अर्थाने एक संस्थात्मक राजकीय पक्ष आहे. उरलेले पक्ष तर एखाद्या व्यक्तीचे अथवा एखाद्या प्रदेशाचे झाले आहेत. मात्र, राष्ट्रीय पक्ष या नावाने देशात जर कोणता पक्ष असेल, तर को केवळ भजप आहे. काँग्रेससोबत माझा 3 पिढ्यांचा संबंध आहे. मी हा महत्वाचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि चिंतनानंतर घेतला आहे. आज मी कोणत्या पक्षाला सोडून येत आहे हा प्रश्न नाही, तर कोणत्या पक्षात जात आहे आणि का जात आहे, हा खरा प्रश्न आहे,'' असेही जितीन प्रसाद यांनी म्हटले आहे.
कोण आहेत जितिन प्रसाद -उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक एक वर्षावर आली असतानाच जितिन प्रसाद यांचे पक्ष सोडून भाजपत जाणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. जितीन प्रसाद हे काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. जितेंद्र प्रसाद हे राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंह राव या दोन माजी पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार होते. जितेंद्र प्रसाद यांनी २००० मध्ये सोनिया गांधींविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती. पण, त्यात त्यांचा पराभव झाला होता.
जितेंद्र प्रसाद यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा जितीन प्रसाद यांनी चालवला. 2001 मध्ये ते युवक काँग्रेसशी जोडले गेले. 2004 मध्ये जितीन यांनी शाहजहाँपूर येथून लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला होता. यूपीए-1 च्या काळात त्यांना मंत्री बनवण्यात आले होते. यानंतर 2009 मध्ये जितीन प्रसाद धौराहा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. यूपीए-२ सरकारच्या काळात त्यांनी पेट्रोलियम, रस्ते वाहतूक यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती.