भोपाळ - मध्य प्रदेशकाँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री कमलनाथ आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. या भेटीत मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक नावांवर चर्चा करण्यात येणार आहे. या दरम्यान चर्चा सुरू आहे की, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर त्यांचा दावा सांगितला आहे. हे पद त्यांना मिळालं नाही तर ते काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मध्य प्रदेशातील काँग्रेसमध्ये गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. सध्या मुख्य मुद्दा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा आहे. या जागेवर विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ सध्या काम पाहत आहेत. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षातील नियमानुसार एका व्यक्तीला एक पद अशी तरतूद असल्याने कमलनाथ यांना हे पद सोडावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप या पदावर कोणाची नियुक्ती झाली नाही.
ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जातात. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर ज्योतिरादित्य यांनी यापदासाठी दावाही सांगितला आहे. तसेच सध्या ते भाजपाच्या अनेक नेत्यांशी संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जर हे पद मिळालं नाही तर शिंदे काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं आहे.
काही दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचं जाहीर समर्थन केलं होतं. काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, दुसरीकडे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांनी कलम 370 हटविल्याचे स्वागत केलं होतं त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला बळ मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अलीकडेच ज्योतिरादित्य शिंदे यांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या छाननी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजकारणाची पुढील दिशा काय असेल हे आगामी काळातच सर्वांना कळेल.
पाहा व्हिडीओ -