...तर राजीव गांधींना सर्वाधिक आनंद झाला असता; काँग्रेस नेत्याने राम मंदिरासाठी पाठवल्या ११ चांदीच्या विटा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 03:31 PM2020-08-04T15:31:35+5:302020-08-04T15:35:13+5:30
राजीव गांधी यांच्यामुळेच राम मंदिराच्या निर्माणाचं स्वप्न साकार होत आहे. आज ते असायला हवे होते. राम मंदिराच्या निर्माणासाठी राज्यातील जनतेकडून ११ चांदीच्या विटा पाठवण्यात येणार असल्याची माहिती कमलनाथ यांनी दिली.
भोपाळ – संपूर्ण देशभरात राम मंदिराच्या भूमीपूजनानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला २०० जणांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यात काँग्रेसचे नेते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंदिर निर्माणचं स्वागत करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.
कमलनाथ यांनी सांगितलं की, प्रभू राम सर्वांचे आहे, आता आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. जर यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी जिवंत असते तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता. राजीव गांधींनी १९८५ मध्ये याची सुरुवात केली होती. १९८९ मध्ये शिलान्यास केला होता, राजीव गांधी यांच्यामुळेच राम मंदिराच्या निर्माणाचं स्वप्न साकार होत आहे. आज ते असायला हवे होते. राम मंदिराच्या निर्माणासाठी राज्यातील जनतेकडून ११ चांदीच्या विटा पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच भारताची संस्कृती सगळ्यांना जोडणारी आहे. याठिकाणी विविध भाषा, धर्माचे लोक राहतात. ही आपली ओळख आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा भाजपाच्या पोटात का दुखू लागते माहिती नाही. हिंदू धर्म फक्त भाजपाची मक्तेदारी आहे का? त्यांनी पेटेंट घेतले आहे का? भाजपाची धर्माची संस्था चालवतंय का? असा सवाल कमलानाथ यांनी उपस्थित केला आहे. त्याचसोबत मी स्वत: छिंदवाडा येथे हनुमानाची मूर्ती स्थापन केली आहे. आमच्या सरकारच्या काळात गोशाळा बनवण्यात आल्या. महाकाल, ओंकारेश्वर मंदिर विकास योजना बनवण्यात आली असं ते म्हणाले.
दरम्यान, आम्ही धर्माचा वापर राजकारणासाठी करत नाही, आम्ही त्याचे इव्हेंट साजरे करत नाही. आमचे विचार धार्मिक असले तरी धर्म आणि राजकारण एकत्र करत नाही. मुहूर्त पाहून काम करत नाही, राज्यातील जनतेच्या आनंदासाठी आम्ही हनुमान चालीसा पठन कार्यक्रम आयोजित केला आहे. साधू, संत आणि शंकराचार्य यांच्याकडून मला आशीर्वाद मिळाले आहेत असंही माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले.