"...तर त्यांना भाजपलाच निवडू द्या"; गुजराती जनतेला कन्हैया कुमारचं आवाहन!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 07:43 PM2022-11-07T19:43:57+5:302022-11-07T19:44:55+5:30
गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
आम आदमी पार्टी (आप) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) हे एकाच टीमचा भाग आहेत आणि दोघेही एकमेकांची कॉपी करतात. एवढेच नाही तर भाजप हा एक वैचारिक पक्ष आहे आणि काँग्रेस हा एकमेव नैसर्गिक विरोधक आहे, जो देशाला पर्यायी विचारधारा देतो. असे काँग्रेस नेता कन्हैया कुमारने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. सध्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी स्वत:ला भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धक म्हणवून घेत आहे. याच पार्श्वभूमीवर कन्हैयाने हे वक्तव्य केले आहे.
गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गुजरात निवडणुकीसंदर्भात बोलताना कन्हैया म्हणाला, असे मानले जाते, की गुजरात जो विचार आज करतो, तो विचार भारत उद्या करतो. येथून अनेक चांगल्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. आम्हाला आशा आहे, की येथून एक राजकीय संदेश जाईल. जर जनता भाजपवर खूश असेल, तर त्यांना भाजपलाच निवडू द्या. पण जर लोकांना बदल हवा असेल, तर ते काँग्रेसला संधी देतील, अशी मला आशा आहे. असेही कन्हैया म्हणाला.
यावेळी कन्हैयाने आम आदमी पार्टीवरही जोरदार निशाणा साधला. "भाजपला 2017 मध्ये लक्षात आले की गुजरातमध्ये पुढील निवडणूक जिंकता येणार नाही. म्हणूनच त्यांनी येथे 'आप'ला आणले. येथे 'ए' आणि 'बी' टीमचा संबंध नाही. कारण भाजप आणि 'आप' एकच टीम आहेत. ते एक एकमेकांचे अनुसरण करत असतात." एवढेच नाही तर, "जेव्हा मोदी आणि केजरीवाल यांची स्वप्ने एकच आहेत, तर मग दोघांमध्ये वैचारिक फरक काय? द्वेष, हिंसा आणि ध्रुवीकरणाचे राजकारण, यावर गप्प बसून राजकारण करण्याची यांची इच्छा आहे, मग वैचारिक मतभेद कुठे आहेत?" असा प्रश्नही यावेळी कन्हैयाने केला.
कन्हैया म्हणाला, "भाजप हा एक वैचारिक आणि केडर असलेला पक्ष आहे. मात्र, एखादा पक्ष वैचारिक आणि केडर असलेला नसेल, तर तो भाजपला आव्हान देऊ शकत नाही. तो भाजपला पर्याय असू शकत नाही. देशात काँग्रेस हाच भाजपचा नैसर्गिक विरोधी पक्ष आहे. एवढेच नाही, तर काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे, ज्याने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही भाजपकडून सत्ता घेचून घेतली, असेही कन्हैया यावेळी म्हणाला.