नवी दिल्ली -काँग्रेसमध्ये सक्रीय नेतृत्वावरून सुरू असलेला कलह थांबण्याचे नाव नाही. पक्षाचे खासदार तथा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून असहमती दर्शवणाऱ्या 23 नेत्यांपैकी एक असलेले कपिल सिब्बल (Congress leader kapil sibal) यांनी पुन्हा एकदा या मुद्यावर भाष्य केले आहे. काँग्रेस आता प्रभावशाली विरोधी पक्ष राहिला नाही. दीड वर्षांपासून पक्षाला अध्यक्ष नाही. अशी कुठली पार्टी चालते का? असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.
इंग्रजी वृत्त वाहिनी ‘India Today’ला दिलेल्या मुलाखतीत, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना सिब्बल म्हणाले, राहुल गांधी यांनी, आपल्याला पक्षाध्यक्ष राहण्याची इच्छा नाही, असे म्हटल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. या गोष्टीला साधारणपणे दीड वर्ष झाले आहे. एखादा पक्ष दीड वर्ष नेत्याशिवाय चालू शकतो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे अथवा कुठे जायचे आहे.
सिब्बल म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून समजते, की उत्तर प्रदेश शिवाय, जेथे काँग्रेस फॅक्टर नाव्हता, एवढेच काय, पण गुजरात आणि मध्य प्रदेशातही जेथे काँग्रेसची भाजपसोबत थेट लढत होती, निकाल अत्यंत खराब राहिला.
“गुजरातमध्ये आमचा सर्वच्या सर्व आठही जागांवर पराभव झाला. 65 टक्के मते भाजपच्या खात्यात गेले. मात्र, ही काँग्रेसमधील पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी रिक्त केलेल्या जागा होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमुळे सर्व 28 जागा रिक्त झाल्या होत्या. पण काँग्रेसला यैंपैकी केवळ आठ जागाच जिंकता आल्या,” असे सिब्बल म्हणाले.
जुलै महिन्यात झालेल्या पक्षाच्या संसदीय गटाच्या बैठकीत हे मुद्दे उपस्थित केले होते. यानंतर 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना ऑगस्ट महिन्यात पत्रही लिहिले. मात्र, त्यावर कसल्याही प्रकारची ना चर्चा झाली, ना हा मुद्दा घेऊन कुणी पुढे गेले, असेही सिब्बल म्हणाले. नुकताच, सिब्बल यांच्यावर काही मंडळींनी निशाणा साधला असतानाच, त्यांनी हे वक्तव्य केले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तर, पक्षांतर्गत समस्या त्यांनी माध्यमांत बोलू नये, असे म्हटले होते.