बर्न : काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्री प्रणीत कौर व त्यांचा मुलगा रणिंदर सिंह यांच्या स्वीस बँकेतील कथित खात्याच्या चौकशीसाठी भारताने स्वीत्झर्लंड सरकारला मदत मागितली आहे. भारतीय कर अधिकाऱ्यांकडून काही नागरिकांच्या स्वीस बँकेतील खात्यांची चौकशी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रणीत कौर आणि रणिंदर सिंह यांच्या कथित खात्याची माहिती मागविली आहे. दरम्यान, स्वीत्झर्लंडमधील एफटीए अर्थात कर प्रशासनाने आपल्या नियमानुसार प्रणीत कौर आणि रणिंदरसिंह यांना याबाबत दहा दिवसांत याचिका दाखल करण्यास अर्थात त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे. स्वीस बँकेकडून अशा प्रकारचे आवाहन म्हणजे खातेधारकाचे खाते आणि अन्य माहिती देण्याबाबतचे एक पाऊल समजले जाते. स्वीत्झर्लंडच्या कर विभागाने याबाबत दोन अधिसूचना जारी करून हा खुलासा केला आहे. अधिसूचनेत नागरिकता आणि जन्मतिथी याशिवाय अन्य माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, याबाबत प्रणीत कौर आणि रणिंदर सिंह यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जागतिक दबावानंतर स्वीत्झर्लंडने गत काही महिन्यांत काही भारतीय आणि अन्य देशांच्या नागरिकांच्या नावाचा खुलासा केलेला आहे हे विशेष. स्वीत्झर्लंडसोबतच्या प्रशासकीय सहायता करारानुसार भारताने स्वीस बँकेतील या कथित खातेदारांची माहिती मागविली आहे. आतापर्यंत स्वीस बँकेत खाते असणाऱ्या बाराहून अधिक खातेदारांची नावे स्वीत्झर्लंडने जाहीर केलेली आहेत. (वृत्तसंस्था)
काँग्रेस नेत्या कौर यांच्या स्वीस खात्याची चौकशी?
By admin | Published: November 25, 2015 12:11 AM